वलसाडमध्ये साजरा झाला अनोख्या रक्षाबंधनाचा हृदयस्पर्शी सोहळा
वलसाड : रक्षाबंधनाचा सण भावंडांच्या नात्याचा गोड साक्षीदार ठरतो, पण यंदा वलसाडमध्ये झालेला हा सोहळा सर्वांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला. एका भावाला त्याच्या मृत बहिणीच्या हातूनच राखी बांधली गेली. विशेष म्हणजे, तो हात आता जिवंत आहे कारण बहिणीच्या निधनानंतर तिचा हात दुसऱ्या मुलीला प्रत्यारोपित करण्यात आला होता.
सप्टेंबर २०२४ मध्ये ९ वर्षांची रिया मिस्त्री हिचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले. रियाचे पालक, बॉबी आणि तृष्णा, यांनी धाडसी निर्णय घेत तिचे अवयवदान केले. तिच्या किडन्या, यकृत, फुफ्फुसे, कॉर्निया आणि उजवा हात इतर गरजूंना देण्यात आला. रियाचा उजवा हात मुंबईतील १६ वर्षीय अनमता अहमद हिला प्रत्यारोपित करण्यात आला. अनमता ही जगातील सर्वात लहान वयाची ‘शोल्डर लेव्हल’ हात प्रत्यारोपण घेणारी मुलगी ठरली.
या वर्षीच्या रक्षाबंधनाला अनमता खास मुंबईहून वलसाडला आली आणि रियाचा भाऊ शिवमच्या हातावर राखी बांधली. त्या क्षणी शिवमला जणू त्याची बहिणच पुन्हा त्याच्यासमोर उभी आहे, असा भावनिक अनुभव आला. आज आम्हाला वाटले जणू रियाच शिवमला राखी बांधायला आली आहे. अनमताला आनंदी पाहून आम्हाला दिलासा मिळतो, असे त्या म्हणाल्या. या भेटीत रियाचे आई-वडील, भाऊ आणि नातेवाईकांनी अनमताचा हात हातात घेतला. सर्वांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. अनमता म्हणाली, माझा भाऊ नव्हता, पण आता मला भाऊ मिळाला आहे. रियाचे कुटुंब आता माझेच कुटुंब आहे.
अनमताच्याही जीवनात या हातामुळे नवीन सुरुवात झाली आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये विजेचा धक्का बसल्याने तिचा उजवा हात खांद्यापासून कापावा लागला होता. डॉ. नीलेश सातभाई आणि त्यांच्या टीमने रियाचा हात यशस्वीरित्या अनमताला प्रत्यारोपित केला. ‘डोनेट लाइफ’चे संस्थापक नीलेश मंडलेवाला यांनी या घटनेला मानवतेचा चमत्कार असे वर्णन केले. हा रक्षाबंधनाचा सोहळा मृत्यूनंतरही नात्यांचे बंध जिवंत राहतात आणि अवयवदानाने आयुष्याला नवी उभारी मिळू शकते, याचा जिवंत पुरावा ठरला.