महिन्यासाठी मोजावे लागणार ८,६०० रुपये

नवी दिल्ली : एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या स्पेसएक्स (SpaceX) कंपनीची उपकंपनी स्टारलिंक (Starlink) अखेर भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्याच्या मार्गावर असून, कंपनीने आपल्या रेसिडेन्शिअल प्लॅनची अधिकृत किंमत जाहीर केली आहे. दुर्गम, डोंगराळ आणि इंटरनेटपासून वंचित गावांमध्ये उच्च गतीचे इंटरनेट पोहोचवणे हा स्टारलिंकचा मुख्य उद्देश आहे.
स्टारलिंक (Starlink) रेसिडेन्शिअल प्लॅन पुढीलप्रमाणे आहे. मासिक शुल्क ८,६००, हार्डवेअर किंमत ३४ हजार (डिश अँटेना, राउटर आणि आवश्यक उपकरणे समाविष्ट) असून पहिल्या महिन्याचा एकत्रित खर्च ४२,६०० (हार्डवेअर अधिक पहिला महिना) आहे. यानंतर प्रत्येक महिन्याला फक्त ८,६०० देऊन सेवा सुरू ठेवता येणार आहे.
सध्या फक्त रेसिडेन्शिअल प्लॅनची घोषणा करण्यात आली असून बिझनेस आणि एंटरप्राइज प्लॅन्सची किंमत लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
स्टारलिंक भारतातील ऑपरेशन्स वाढवत असून, कंपनीने बेंगळुरू येथे अनेक पदांसाठी भरती सुरू केली आहे. यामध्ये पेमेंट्स मॅनेजर, अकाउंटिंग मॅनेजर, सीनियर ट्रेझरी अॅनालिस्ट आणि टॅक्स मॅनेजर यांचा समावेश आहे.
स्टारलिंकने भारतात गेटवे अर्थ स्टेशन उभारण्याची योजना आखली असून, ही केंद्रे चंदीगड, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, मुंबई आणि नोएडा या शहरांत असतील. ही केंद्रे भारतीय ग्राहकांच्या डिश अँटेना व उपग्रहांमध्ये सिग्नल जोडण्याचे महत्त्वाचे काम करतील.
ग्रामीण भारतात इंटरनेटची क्रांती
स्टारलिंकमुळे ग्रामीण शाळा, आदिवासी क्षेत्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि इंटरनेटपासून वंचित पंचायतांना उच्च-गती व विश्वसनीय इंटरनेट मिळण्याची मोठी अपेक्षा आहे.
सेवेची मुख्य वैशिष्ट्ये
अनलिमिटेड हाय-स्पीड इंटरनेट (१००–२०० एमबीपीएसपर्यंत अपेक्षित)
कोणत्याही हवामानात काम करणारी सुविधा
९९.९ टक्केपेक्षा अधिक अपटाइम
प्लग-ॲण्ड-प्ले सेटअप : सहज आणि त्वरित सुरू होणारी सेवा
लो-अर्थ-ऑर्बिट सॅटेलाइट तंत्रज्ञान
डेटा कॅप किंवा वेगावर मर्यादा नाही