मुंबई : भारतीय वनसेवा (आयएफएस) अधिकारी परवीन कासवान यांनी एक्सवर दोन हत्तीच्या पिल्लांचा सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा व्हिडिओ इंटरनेटवर तूफान पसंती मिळवत आहे. गजराज आणि तिस्ता नावाच्या या पिल्लांनी लहान वयातच आपली आई गमावली. त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर दोघांनाही रेस्क्यू करून वन विभागाच्या आणि माहूतांच्या देखरेखीखाली वाढवले जात आहे.
कासवान यांनी पोस्टमध्ये लिहिले, काल शेतात असताना, गजराज आणि तिस्ता यांना भेटलो. त्यांना त्यांचा ‘टोल टॅक्स’ हवा होता. त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर वाचवण्यात आलेले हे दोघे सध्या जवळच्या जंगलात आमच्या माहुतांच्या देखभालीखाली आहेत. व्हिडिओमध्ये दोन्ही पिल्ले निवांत मूडमध्ये वन कर्मचाऱ्यांसोबत फिरताना, खाऊ खाताना आणि आणखी खाऊ मागताना दिसतात. या गोंडस क्षणांनी नेटिझन्सचे मन जिंकले आहे.
सोशल मीडियावर अनेकांनी पिल्लांबद्दल आपुलकी व्यक्त करत त्यांच्या काळजी घेणाऱ्या वन पथकाचे कौतुक केले. किती गोड आणि गोंडस पिल्ले आहेत. लहान वयात आई गमावल्याचे दुःख आहे, पण त्यांची काळजी उत्तम घेतली जातेय हे पाहून आनंदही होत आहे, असे एका वापरकर्त्याने म्हटले. आणखी एका वापरकर्त्याने या पिल्लांना सर्वात गोंडस टोल वसूली करणारे म्हणून संबोधले. ही भावनिक आणि हळवी पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून, हजारो लोकांनी ती पाहून प्रेमाचा वर्षाव केला आहे.