कर्नाटक : ...२५०० कुत्रे मारून झाडांखाली पुरले : वि.प. सदस्याचे धक्कादायक विधान

कर्नाटकात खळबळ : यावर्षी कर्नाटकात २.४ लाख लोकांना कुत्र्यांनी घेतला चावा; रेबीजमुळे ओढवला १९ लोकांचा मृत्यू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
13th August, 05:11 pm
कर्नाटक : ...२५०० कुत्रे मारून झाडांखाली पुरले : वि.प. सदस्याचे धक्कादायक विधान

बंगळुरू : कर्नाटकातील धर्मस्थळ येथे मानवी सांगाडे पुरल्याच्या स्वच्छता कर्मचाऱ्याच्या वक्तव्यावरून खळबळ माजल्यानंतर आता आणखी एक वक्तव्यावरून याठिकाणी वादंग सुरू आहे. कर्नाटक विधान परिषदेचे जेडीएस सदस्य एस एल भोजेगौडा यांनी आपण दोन हजार पाचशे भटक्या कुत्र्यांना मारून झाडांखाली पुरल्याचे वक्तव्य केले आहे. मुख्य म्हणजे सभागृहातच त्यांनी हे वक्तव्य केल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

सभागृहात भटक्या कुत्र्यांच्या विषयावरील चर्चेच्या वेळी भोजेगौडा यांनी हे वादग्रस्त विधान करून खळबळ निर्माण केली. ते म्हणाले की, आपण नगरपरिषदेचे अध्यक्ष असताना २ दोन हजार, ५०० कुत्र्यांना मारून झाडांखाली पुरले. बरीच वर्षे विधान परिषदेचे सदस्य असलेले भोजेगौडा यांनी कुठल्या कार्यकाळात हे कृत्य केले ते स्पष्ट  केलेले नाही.

माहितीनुसार, कर्नाटकात यावर्षी भटक्या कुत्र्यांनी २.४ लाख लोकांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत तर १९ जणांचा रेबीज मुळे मृत्यू ओढवला आहे. नगर प्रशासन मंत्री रहीम खान यांनी सांगितले की, सध्याच्या नियमात केवळ भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याची अनुमती आहे. भोजेगौडा यांनी सांगितले की, कुणी रस्त्यांवरील भटक्या कुत्र्यांना पळवून लावण्यास विरोध करीत असेल तर सरकारने त्यांच्या घरी दहा-दहा कुत्रे सोडावेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ट्विटर पोस्ट करत भटक्या कुत्र्यांना धोकादायक समजून मारणे शासन नाही तर क्रूरता आहे असे म्हटले. कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे, सामुदायिक देखभाल केंद्रात पाठवणे यांसारखे उपाय करता येतात. असे त्यांनी त्यात पुढे लिहिले आहे. त्यांची ही प्रतिक्रिया सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांना रस्त्यांवरून हटवून लवकरात लवकर आश्रय स्थळांत स्थलांतरीत करण्याचे आदेश दिल्यानंतर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे की, भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने जास्त करून लहान मुलांना रेबीज होण्याचा धोका आहे व हे खूप गंभीर आहे. 

मुख्यमंत्र्यांची ही पोस्ट काँग्रेस नेता राहुल गांधी यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया म्हणून पुढे आला आहे. अलीकडेच राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, दिल्ली-एनसीआर मधून भटक्या कुत्र्यांना हटवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मानवी मूल्यांच्या विरोधात आहे. काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी म्हटले आहे की,  भटक्या कुत्र्यांना पूर्णपणे हटवण्याचा आदेश क्रूर, अदूरर्शी आहे.


हेही वाचा