दिल्ली : आशियातील सर्वात लांबीच्या ‘रुद्रस्त्र’ मालगाडीची यशस्वी चाचणी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
10th August, 03:09 pm
दिल्ली : आशियातील सर्वात लांबीच्या ‘रुद्रस्त्र’ मालगाडीची यशस्वी चाचणी

दिल्ली : भारतीय रेल्वेने देशाच्या मालवाहतूक क्षमतेचा विस्तार करून नवा इतिहास रचला आहे. ४.५ किलोमीटर लांबीची ‘रुद्रस्त्र’ ही देशातील आणि पर्यायाने आशिया खंडातील आतापर्यंतची सर्वात लांब मालगाडी असून, तिची यशस्वी चाचणी पूर्ण झाली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः या यशाची माहिती देत व्हिडिओ शेअर केला.


‘रुद्रस्त्र’मध्ये एकूण ३५४ वॅगन्स आणि सात इंजिनांचा समावेश आहे. सहा वेगवेगळ्या मालगाड्यांचे रॅक एकत्र करून हा प्रचंड कॅरेज तयार करण्यात आला. उत्तर प्रदेशातील गंजख्वाजा येथून झारखंडमधील गढवा रोडपर्यंतचा सुमारे २०० किमी प्रवास ‘रुद्रस्त्र’ने अवघ्या पाच तासांत पूर्ण केला. या चाचणीत काही अंतर समर्पित फ्रेट कॉरिडॉरवर तर काही अंतर सामान्य रेल्वे ट्रॅकवर पार करण्यात आले.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, जर हे सहा रॅक स्वतंत्रपणे धावले असते, तर प्रत्येकासाठी वेगळा क्रू, वेळापत्रक आणि मार्ग नियोजन आवश्यक झाले असते. एकत्रितपणे चालवल्यामुळे वेळ, मानवी संसाधने आणि ऑपरेटिंग खर्चात मोठी बचत झाली. यामुळे मालवाहतूक अधिक वेगवान आणि किफायतशीर होणार आहे, ज्याचा थेट फायदा देशाच्या लॉजिस्टिक्स क्षेत्राला होईल.

‘रुद्रस्त्र’च्या संचालनासाठी अत्यंत तांत्रिक समन्वय आणि अचूक नियंत्रण आवश्यक होते. हे आव्हान पूर्व मध्य रेल्वेच्या पं. दीनदयाळ उपाध्याय विभागाने यशस्वीरीत्या पार केले. हा विभाग मालवाहू वॅगन्सच्या दुरुस्ती आणि तांत्रिक तपासणीसाठी आधीच प्रसिद्ध आहे.

जरी ‘रुद्रस्त्र’ ही भारतातील सर्वात लांब मालगाडी असली, तरी जागतिक विक्रम ऑस्ट्रेलियातील बिएचपी कंपनीकडे आहे. त्यांच्या मालगाडीची लांबी तब्बल ७.३ किमी असून, त्यात ६८२ वॅगन्स आहेत. तरीदेखील, भारतीय रेल्वेची ही कामगिरी जागतिक दर्जाच्या मालवाहतूक क्षमतेच्या दिशेने टाकलेले भक्कम पाऊल मानले जात आहे.

हेही वाचा