लखनौ : २०२३ मध्ये त्रिवेणी एक्सप्रेसमध्ये एका १७ वर्षीय मुलीची छेड काढल्याच्या आरोपावरून जीआरपीचे कॉन्स्टेबल तौफिक अहमद यांना तत्कालीन पोलीस महानिरीक्षक राकेश सिंग यांनी सेवेतून बडतर्फ केले. विभागीय चौकशीत दोषी ठरवून त्यांनी हा आदेश काढला होता.
पण दोन वर्षांनंतर, आता या प्रकरणात उलटफेर झाला. तौफिक अहमद यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांच्या वतीने लढा देण्यासाठी कोर्टात उतरली वकील अनुरा सिंग. आश्चर्य म्हणजे अनुरा सिंग ही तौफिकला नोकरीवरून हाकलून लावणारे तत्कालीन आयजीपी राकेश सिंग यांची मुलगी आहे!
कोर्टात अनुरा यांनी चौकशीतील प्रक्रियात्मक त्रुटी व आदेशातील कायदेशीर उणिवा दाखवून दिल्या. अखेर ३१ जुलै २०२५ रोजी इलाहाबाद उच्च न्यायालयाने चौकशी अहवाल आणि बडतर्फी आदेश दोन्ही रद्द करून तौफिक अहमद यांची नोकरी परत देण्याचा आदेश दिला. सध्या बरेली पोलिसांकडून या आदेशाची अंमलबजावणी सुरू आहे. या प्रकरणाने पोलीस खात्यात आणि वकिलांत एकच चर्चा रंगली आहे. वडील नियम पाळणारे अधिकारी, तर मुलगी न्याय मिळवून देणारी वकील! दोघांनीही आपल्या आपल्या भूमिकेत व्यावसायिक प्रामाणिकपणा दाखवून दिला.