कर्नाटक : डेंटिस्ट जावयाकडून सासूचा खून; शरीराचे १९ तुकडे करून फेकून दिले

कर्नाटकातील तुमकुरू येथील घटना : चारित्र्याच्या संशयावरून टोकाचे पाऊल

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
13th August, 11:41 pm
कर्नाटक : डेंटिस्ट जावयाकडून सासूचा खून; शरीराचे १९ तुकडे करून फेकून दिले

बेंगळुरू : ४२ वर्षीय सासूच्या अनैतिक संबंधांमुळे आपल्या प्रतिमेला धक्का लागत असल्याच्या कारणावरून डेंटिस्ट असलेल्या जावयाने सासूचा खून केल्याची धक्कादायक घटना कर्नाटकातील तुमकुरू (Tumkuru) येथील कोराटगेरे येथे घडली. दोन साथीदारांच्या मदतीने आपल्या सासूची हत्या केल्यानंतर जावयाने तिच्या शरीराचे १९ तुकडे करून ते फेकून दिले.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, लक्ष्मी देवम्मा (४२) हिची तिचा डेंटिस्ट असलेला जावई डॉ. रामचंद्रप्पा एस. आणि त्याच्या दोन साथीदारांनी निर्घृण हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, रामचंद्रप्पा यांना लक्ष्मी देवी यांच्या चारित्र्यावर संशय होता. तिच्या अशा वागण्यामुळे आपली बदनामी होते, या कारणावरून रामचंद्रप्पा याने तिचा खून केला.

कोराटगेरे येथील कोलाला गावात रस्त्याच्या कडेला एका महिलेचे कापलेले डोके आणि तिच्या अर्धवट कुजलेले शरीराचे काही तुकडे सापडले होते. अनेक प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून हे तुकडे फेकून देण्यात आले होते. पोलिसांनी महिलेच्या डोक्याच्या मदतीने ओळख पटविली. सर्व पिशव्या जप्त केल्यानंतर तपासाअंती लक्ष्मी देवम्मा यांची निर्घृण हत्या करून त्यांचे १९ तुकडे करण्यात आल्याचे पोलिसांना आढळून आले.

पोलीस अधीक्षक अशोक के. व्ही. यांनी खून प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि तपास करण्यासाठी एक पथक तयार केले. त्यांनी रामचंद्रप्पा आणि त्याचे सहकारी सतीश के. एन. आणि किरण के. एस. यांना अटक केली. हे तिघेही आरोपी तुमकुरू येथील रहिवासी आहेत.

आरोपींकडून गुन्हा कबुल

पोलीस अधीक्षक अशोक के. व्ही. यांनी सांगितले की, चौकशीदरम्यान आरोपींनी लक्ष्मी देवम्मा यांची हत्या केल्याचे कबूल केले आहे. त्यांनी पोलिसांना सांगितले की, पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ते भरले आणि विविध ठिकाणी फेकून दिले.

हेही वाचा