गणेश चतुर्थीच्या तोंडावर दुर्घटना : शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज
म्हापसा : वायंगिणवाडा, नास्नोळा येथील दिनेश पटेकर यांच्या घराला सोमवारी सकाळी अचानक आग लागली. या दुर्घटनेत अंदाजे ५ लाखांचे मोठे नुकसान झाले असून, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
ही घटना सोमवारी सकाळी १०:५० च्या सुमारास घडली, जेव्हा पटेकर कुटुंब घर बंद करून बाहेर गेले होते. घरातून धूर बाहेर येत असल्याचे पाहून त्यांच्या भावाच्या कुटुंबाने तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. माहिती मिळताच, म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत घरातील एका खोलीतील कपाट, खाट, फ्रीज, टीव्ही, कपडे आणि इतर सामान जळून खाक झाले होते. कौलारू छप्परही जळाले.
अग्निशमन दलाचे अधिकारी गणेश गोवेकर यांच्यासह उपअधिकारी प्रकाश कान्नाईक, अमित फडते, भगवान पाळणी, विष्णू केसरकर, अशोक वळवईकर आणि लविंदर साळगावकर यांनी ही आग विझवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलिसांनी पंचनामा केला, तर स्थानिक पंच सदस्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गणेश चतुर्थीच्या सणासुदीच्या तोंडावर ही दुर्घटना घडल्याने, नुकसान झालेल्या कुटुंबाने सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.