गोव्यात बैल-रेड्यांना मायक्रोचिप बसवा अन्यथा त्यांची रवानगी थेट गोशाळेत; गोवा सरकारचा आदेश.
पणजी : गोव्यातील बेकायदेशीर धिरयो (रेड्यांची किंवा बैलांची झुंड) रोखण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा संचालनालयाने काढलेल्या अधिसूचनेनुसार राज्यातील सर्व बैल व रेड्यांना मायक्रोचिप बसवून आणि नोंदणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने बैलांच्या लढतींना (धिरयोंना) बेकायदेशीर घोषित केले होते. त्यानंतर अनेकदा त्याचे उल्लंघन झाले. पीपल फॉर अॅनिमल्स, गोवा संस्थेने दाखल केलेल्या अवमान याचिकेनंतर ही सरकारने आता या कायद्याची कडक कार्यवाही करण्याचे ठरवले आहे.
सरकारचा आदेश काय म्हणतो?
१- रेडे किंवा बैलांच्या मालकांनी आपल्या जनावरांना विभागीय पशुवैद्यक अधिकाऱ्याकडून मायक्रोचिप बसवून नोंदणी करून घ्यावी. यासाठी अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून एका महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
२- संबंधित पोलीस निरीक्षकांनी आपल्या हद्दीत हे काम वेळेत पूर्ण होण्याची खात्री करावी.
३- वेळेत नोंदणी न केलेल्या रेडे तसेच बैलमालकांना बेकायदेशीर धिरियोंमध्ये सहभागी होण्याचा उद्देश असल्याचे गृहीत धरले जाईल.
४- नोंदणी नसलेले बैल व रेडे जप्त करून ते गोशाळेत पाठवले जातील.
५-नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ५० हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. हा दंड गोशाळेत तीन महिन्यांच्या देखभाल खर्चाइतकाच आहे.
पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय संचालक डॉ. वीणा कुमार यांनी हा आदेश काढला आहे.