मडगाव : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिपदाबाबत संकेत दिलेले होते. मात्र, अजूनही अधिकृतरित्या पत्र मिळालेले नाही. कदाचित उद्या गुरुवारी शपथविधी होऊ शकतो, असे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले.
दक्षिण गोवा जिल्हा भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी आमदार दिगंबर कामत यांना मंत्रिपद मिळण्याबाबत प्रसारमाध्यमांनी प्रश्न केला असता, मला अजूनतरी अधिकृतपणे पत्र आलेले नाही. पण मुख्यमंत्र्यांनी रात्री आपणास मंत्रिपद देण्याबाबत संकेत दिलेले होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी रात्री व सकाळीही बोलणे झालेले आहे. मुख्यमंत्री दिल्लीला गेलेले असल्याने आजतरी काहीही होऊ शकत नाही.
मुख्यमंत्री सावंत दिल्लीहून रात्री येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी शपथविधी होऊ शकतो, असेही स्पष्ट केले. आलेक्स सिक्वेरा मंत्रिपदाचा राजीनामा देत आहेत, याबाबत विचारणा केली असता, त्याबाबत आपण काहीही बोलू शकत नाही, असे स्पष्ट केले.