मडगाव : जुन्या हॉस्पिसिओ इमारतीनजीक बुधवारी दुपारी घडलेल्या रोडरेजच्या प्रकाराने मडगावात खळबळ उडाली. दुचाकी आडवी घालून काही संशयितांनी राशीद अली याला मारहाण केली. त्याला वाचवण्यासाठी धावून आलेल्या त्याच्या भावाला, शाकीद अलीलाही बेदम मारहाण करण्यात आली.
राशीद अली याने दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी त्याची दुचाकी अडवून ‘गाडी लावल्याचे कारण’ देत हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी तो जवळच्या आरोग्य केंद्रात लपला आणि पोलिसांना कॉल केला. मात्र, संशयितांनी आणखी काही जणांना बोलावून घेत फायर हायड्रंट काढून त्याच्या डोक्यावर प्रहार केला. त्यावेळी संशयितांकडे चाकूही होता आणि त्यांनी वार करण्याचा प्रयत्न केला, असे जखमीने सांगितले.
या हल्ल्यात शाकीद अलीलाही मारहाण झाली. दोघांही उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. फातोर्डा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून चार ते पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक नाथन आल्मेदा यांनी सांगितले की, संशयितांचा शोध सुरू आहे आणि त्यांना लवकरच अटक केली जाईल.