आलेक्स सिक्वेरांचा राजीनामा, लवकरच मोठे खातेबदल
पणजी : गोव्यात गुरुवारी दुपारी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे आणि त्यानंतर खाते वाटपातून मुख्यमंत्री काही मंत्र्यांना धक्के देण्याची शक्यता आहे. आज पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री या संदर्भातील प्रस्तावाला अंतिम स्वरूप देतील. गुरुवारी राजभवनच्या दरबार हॉलमध्ये दोन मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. रमेश तवडकर आणि दिगंबर कामत हे मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी तवडकर राजीनामा देतील.
बुधवारी पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी राजीनामा दिला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दिल्लीतून बुधवारी रात्री परतल्यावर गुरुवारी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे गोवन वार्ताशी बोलताना सांगितले. त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. गुरुवारी सकाळी ११.३६ ते दुपारी १२.३६ वाजे पर्यंत चांगला मुहूर्त आहे. त्या दरम्यान शपथविधी होणार आहे. शुक्रवारपर्यंत मुख्यमंत्री खातेवाटप करतील.
मुख्यमंंत्र्यांनी दिले मंत्रिपदाचे संकेत : कामत
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिपदाबाबत संकेत दिलेले होते. मात्र, अजूनही अधिकृतरित्या पत्र मिळालेले नाही. कदाचित उद्या गुरुवारी शपथविधी होऊ शकतो, असे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले. दक्षिण गोवा जिल्हा भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी आमदार दिगंबर कामत यांना मंत्रिपद मिळण्याबाबत प्रसारमाध्यमांनी प्रश्न केला असता, मला अजूनतरी अधिकृतपणे पत्र आलेले नाही. पण मुख्यमंत्र्यांनी रात्री आपणास मंत्रिपद देण्याबाबत संकेत दिलेले होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी रात्री व सकाळीही बोलणे झालेले आहे, असे ते म्हणाले.
लोबो, संकल्पला तूर्तास संधी नाही
मायकल किंवा डिलायला लोबो यांच्यापैकी एकाला तसेच संकल्प आमोणकर यांना तूर्तास मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान पुढील काही दिवसांत दोन मंत्र्यांच्या न्यायालयीन खटल्यांचा निकाल लागणार आहे. त्यामुळे ते दोषी आढळले तर त्यांचे मंत्रीपद धोक्यात येऊ शकते. अशा वेळी आणखी दोन आमदारांना मंत्रीपद मिळू शकते. पर्यटन विकास महामंडळ एका आमदाराला मिळणार आहे.
गणेश गावकर नवे सभापती
तवडकर यांच्या राजीनाम्यानंतर सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांची नवे सभापती म्हणून निवड करण्यात येणार आहे अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.
भारतीय जनता पक्षात पक्षापेक्षा कोणीही व्यक्ती मोठी नसते. पक्षाची गरज म्हणून सभापतीपदाचा त्याग करून मी उद्या मंत्रीपदाची शपथ घेत आहे. सभापतीपदाला न्याय देण्याबरोबर पदाची प्रतिष्ठा वाढविण्यात मी यशस्वी झालो : रमेश तवडकर, सभापती
मी मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पाठविला आहे. व्यक्तिगत कारणासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे : आलेक्स सिक्वेरा, पर्यावरण मंत्री