राजीव गांधींनी गोव्याची स्वतंत्र अस्मिता कायम ठेवली : अमित पाटकर

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
6 hours ago
राजीव गांधींनी गोव्याची स्वतंत्र अस्मिता कायम ठेवली : अमित पाटकर

पणजी : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात कोकणी भाषेला आठव्या परिशिष्टात स्थान मिळाले होते. एका अर्थाने त्यांनी गोव्याची स्वतंत्र अस्मिता कायम ठेवल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले. बुधवारी राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त पणजीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार कार्लुस फेरेरा, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

राजीव गांधी यांना गोव्याबाबत विशेष आपुलकी होती. त्यांच्या कार्यकाळातच गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला होता. गोवेकरांनी अशा महान व्यक्तीची आठवण कायम ठेवणे आवश्यक आहे. तरुणांनी त्यांचे आदर्श घेऊन पुढे जावे. राजीव गांधी हे तंत्रज्ञानाच्या पुरस्कारासाठी ओळखले गेले. आज देशात इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात प्रगती झाली आहे. याची सुरुवात राजीव गांधी यांच्या काळातच झाली होती. त्यांनीच देशात माहिती आणि तंत्रज्ञान क्रांती आणली होती, असे पाटकर म्हणाले.

राजीव गांधी यांना देशातील युवकांचे सामर्थ्य माहिती होते. ते स्वतः देखील देशाच्या इतिहासातील सर्वात तरुण पंतप्रधान होते. त्यांना युवकांना सक्षम करून लोकशाही प्रक्रियेत समाविष्ट करून घ्यायचे होते. यासाठी त्यांनी मतदानाचा अधिकार वय वर्षे २१ वरून कमी करून १८ वर्षे केला होता. त्यांना सत्तेचे विकेंद्रीकरण करणे आवश्यक वाटले. यासाठी त्यांच्या कार्यकाळात ७३ आणि ७४ वी घटना दुरुस्ती करून पंचायत, नगरपालिकांना अधिक अधिकार देण्यात आल्याचे पाटकर यांनी सांगितले.

आमदार फेरेरा यांनी राजीव गांधी यांच्यासह अन्य काँग्रेस नेत्यांना गोव्याविषयी आपुलकी असल्याचे सांगितले. राजीव गांधी यांचा खरा इतिहास माहिती असणाऱ्या लोकांनी काँग्रेस पक्षासोबत राहणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. फ्रान्सिस सार्दिन यांनी राजीव गांधी यांच्यामुळेच गोव्यातील लोकांना आमदार, खासदार, मंत्री होण्याची संधी मिळाल्याचे सांगितले. अन्यथा गोवा महाराष्ट्रात विलीन होऊन येथे महाराष्ट्राचे एक किंवा दोन आमदार असते असे ते म्हणाले.

हेही वाचा