
पणजी : गोवा राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा पंचायत निवडणुकांसाठीची प्रक्रिया सुरू केली असून उत्तर आणि दक्षिण गोव्यातील जिल्हा पंचायत मतदारसंघांची फेररचना केली जाणार आहे. यासाठी आयोगाने अधिसूचना जारी केली असून उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यात प्रत्येकी २५ असे एकूण ५० मतदारसंघ करण्यात येणार आहेत.
राज्य निवडणूक आयुक्त दौलत हवालदार यांनी जारी केलेल्या आदेशानुसार या प्रक्रियेसाठी उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक नोंदणी अधिकारी तसेच संबंधित तालुक्यांच्या मामलदारांना साहाय्यक नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मतदारसंघांची रचना करताना १ जुलै २०२५ पर्यंतच्या अद्ययावत मतदार याद्या विचारात घेतल्या जाणार आहेत.
या प्रक्रियेनुसार प्रत्येक मतदारसंघाला स्वतंत्र क्रमांक दिला जाईल तसेच मतदारसंघांचा नकाशा तयार करून ११ सप्टेंबर २०२५ पर्यंत सर्व माहिती राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डिसेंबर महिन्यात जिल्हा पंचायत निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.