मडगाव : मुंगूल येथील गँगवॉरप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केलेले राहुल तलवार आणि मंदार प्रभू गावकर या दोन संशयितांना अटक केली आहे. यानंतर या प्रकरणातील अटक झालेल्या संशयितांची संख्या २१ वर पोहोचली आहे. अजून काही अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
१२ ऑगस्ट रोजी शगुन हॉटेलनजीक गाडी अडवून तलवार, कोयता, सोडा बॉटल्स वापरत हल्ला करण्यात आला होता. यावेळी गोळीबार देखील झाला. या हल्ल्यात रफीक ताशान (२४) आणि युवकेश सिंग बदैला (२०) गंभीर जखमी झाले होते. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या पथकांनी या प्रकरणातील अनेक संशयितांना गोवा व बेळगावातून अटक केली आहे.
आतापर्यंत अटक झालेल्यांमध्ये विल्सन कार्व्हालो, शाहरुख शेख, रसूल शेख, मोहम्मद अली, वासू कुमार, सूरज माझी, मलिक शेख, गौरांग कोरगावकर, सुनील बिलावर, जॉयस्टन फर्नांडिस, इम्रान बेपारी, अक्षय तलवार, अविनाश गुंजीकर, परशुराम राठोड, दीपक कट्टीमणी, अमर कुलाल, ताहीर, सलीम आणि महेंद्र नाईक यांचा समावेश आहे. यात दीपक कट्टीमणी हा सरकारी कर्मचारी असून त्याने संशयितांच्या वास्तव्याची सोय केली होती, असे तपासात स्पष्ट झाले आहे.
फातोर्डा पोलिसांनी हल्ल्यात वापरलेला कोयता, इतर हत्यारे आणि सहा कार जप्त केल्या आहेत. मात्र, वापरलेली बंदूक अजून सापडलेली नाही. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक वर्मा यांनी या हल्ल्याला गँगवॉर असल्याचे स्पष्ट करत आणखी अटक होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. हा हल्ला ड्रग्जसंबंधातील वर्चस्वाच्या वादातून झाल्याची चर्चा असली तरी पोलिसांना याबाबत ठोस माहिती मिळालेली नसल्याचे त्यांनी नमूद केले.