वृत्तपत्र, नियतकालिकांची नोंदणी होणार आणखी सुलभ
माध्यमांशी संवाद साधताना योगेश बावेजा.
हैदराबाद : वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांसाठी नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ‘प्रेस सेवा’ हे पोर्टल ‘एक खिडकी उपाय’ म्हणून सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे पारदर्शकता वाढेल, मंजुरी जलद होईल आणि प्रकाशकांसाठी व्यवसाय करण्याची सोय सुधारेल. तसेच प्रकाशकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवल्या जातील, असे प्रेस रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (PRGI) योगेश बावेजा (Yogesh Baweja) यांनी सांगितले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, हैदराबाद यांनी आयोजित केलेल्या वार्तालप कार्यक्रमात ते माध्यमांच्या प्रकाशकांशी संवाद साधत होते.
पीआयबी हैदराबादच्या अतिरिक्त महासंचालक श्रुती पाटील (Shruti Patil) यांनी प्रकाशकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना नवीन नियतकालिक नोंदणी कायद्यावर (पीआरपी कायदा) मार्गदर्शन केले. तेलंगणामध्ये आयोजित केलेल्या या पहिल्याच संवादात्मक सत्रात पीआरजीआयच्या मदतीने पीआयबी हैदराबाद लवकरच प्रकाशकांसाठी एक समर्पित हेल्पलाइन स्थापन करेल, अशी घोषणाही त्यांनी केली.
६० दिवसांत प्रतिसाद न मिळाल्यास अर्ज मंजूर!
प्रेस उपरजिस्ट्रार आशुतोष मोहले (Ashutosh Mohle) यांनी स्पष्ट केले की, गेल्या वर्षी मार्चपासून संपूर्ण नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे. ६० दिवसांच्या आत प्रतिसाद न मिळाल्यास अर्ज मंजूर मानले जातील, असे त्यांनी सांगितले आणि प्रकाशकांनी एजंटांपासून दूर राहून थेट PRGI पोर्टल वापरण्याचे आवाहन केले.