धारगळ येथे जळालेल्या ट्रकच्या पसार चालकाला अटक

पेडणे पोलिसांची कारवाई : गुजरामध्ये ठोकल्या बेड्या


13 hours ago
धारगळ येथे जळालेल्या ट्रकच्या पसार चालकाला अटक

धारगळ येथे जळालेल्या ट्रकचे संग्रहित छायाचित्र.
विशेष प्रतिनिधी। गोवन वार्ता
पेडणे : महाखाजन, धारगळ येथे अवैध दारूची तस्करी करणाऱ्या ट्रकला १७ जून रोजी आग लागली होती. या घटनेनंतर ट्रकचा चालक पसार झाला होता. या घटनेच्या तब्बल दोन महिन्यांनंतर पसार ट्रक ड्रायव्हरला पेडणे पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे. त्यामुळे दारू तस्करीविषयीच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे.
पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जून रोजी पहाटे महाखाजन-धारगळ येथे एका कंटेनर ट्रकला अचानक आग लागली होती. पेडणे अग्निशामक दलाने तातडीने घटनास्ळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली होती. कंटेनरचे सील तोडले असता आत १,२८६ पेट्या विविध ब्रॅण्डच्या दारूच्या बाटल्या आढळल्या होत्या. तपासाअंती अज्ञाताने कंटेनर ट्रकचा चेसिस क्रमांक खोडून बदलला असल्याचे दिसून आले होते. एनएल ०१ ए २५९८ हा बनावट क्रमांक वापरून ट्रकमधून अवैध दारू वाहतूक केली जात होती. पोलिसांना चकवा देऊन चालकाने कंटेनर घटनास्थळी सोडून पलायन केले होते. कंटेनर ट्रकमध्ये सुमारे साठ लाख रुपये किमतीची अवैध दारू आढळली होती. ती पेडणे अबकारी विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी दिली आहे.
ट्रकचा चालक व मालक दोघेही पसार होते. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे शोधमोहीम सुरू ठेवली होती. अखेर १८ ऑगस्ट रोजी ट्रक चालकास गुजरातमधून अटक करण्यात आली. अटक केलेला आरोपी पोलीस कोठडीत असून त्याची ओळख सद्दाम (४२, रा. ढकालपूर, हरियाणा) अशी आहे. वाहनाचा मालक अद्यापही पसार असून त्याचा शोध सुरू आहे. याप्रकरणी पेडणे पोलीस स्थानकात गुन्हा क्र. ३६/२०२५ भा.दं.सं. कलम ३१८(२), ३३६(२), ३३६(३) आणि ३४०(२) सह कलम ३(५) अंतर्गत नोंद झाला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक तुकाराम चोडणकर करत आहेत.