लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार

नानोडातील १८ वर्षीय युवकाला अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13th August, 11:39 pm
लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार

म्हापसा : सावंतवाडी येथील एका २२ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली कोलवाळ पोलिसांनी नानोडा येथील १८ वर्षीय युवकाला अटक केली. डिचोली पोलिसांनी शून्य एफआयआर नोंद करून हे प्रकरण नोंद केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

दि. २२ एप्रिल २०२५ रोजी रात्री १०.३० वा. सुमारास हा लैंगिक अत्याचाराचा प्रकार थिवी येथील एका गेस्ट हाऊसच्या खोलीमध्ये घडला होता. पीडित महिलेला ४ वर्षांचे लहान मूल आहे. तिला तिच्या नवऱ्याने सोडचिठ्ठी दिली आहे.

संशयित आरोपी हा आपल्या एका मित्राच्या लग्नाला सावंतवाडी येथे गेला होता. तिथे पीडितेशी त्याची भेट झाली. त्यांच्यात मैत्री वाढली. संशयिताने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिला थिवीमध्ये आणले. तिथे घटनास्थळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

त्यानंतर संशयिताने तिला मुलासमवेत डिचोली तालुक्यातील एका भाड्याच्या खोलीत आणून ठेवले. मात्र, संशयित आपल्याशी लग्न करण्यास तयार नसल्याचे पाहून तिने मंगळवारी १२ रोजी डिचोली पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.

तक्रारीच्या आधारे डिचोली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा गावस यांनी शून्य कलमान्वये गुन्हा दाखल केला. हा लैंगिक अत्याचाराचा प्रथम गुन्हा कोलवाळ पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडल्याचे स्पष्ट झाल्यावर हे प्रकरण डिचोली पोलिसांकडून हस्तांतरीत करण्यात आले. कोलवाळ पोलिसांनी या प्रकरणी भा.न्या.सं.च्या ६९ कलमान्वये गुन्हा दाखल केला. बुधवार, दि. १३ रोजी पहाटे संशयिताला पकडून त्याला अटक केली.

पुढील तपास पोलीस निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सनी काणेकर हे करीत आहेत. 

हेही वाचा