डीजीजीआय गोवाची कारवाई : चेन्नईतून एकाला अटक
गोवन वार्ता
पणजी : गोव्यात दोन आस्थापने सुरू करून बनावट बिलांद्वारे सुमारे ४० कोटी रुपयांचा जीएसटी घोटाळा झाला होता. या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यात जीएसटी इंटेलिजेन्स महासंचालनालच्या (डीजीजीआय) गोवा विभागाला यश आले आहे. या प्रकरणी विभागाने आंतरराज्य टोळीचा म्होरक्या पुखराज किशना राम (मूळ राजस्थान) याला चेन्नईतून अटक केली आहे. गोव्यातील हा पहिलाच जीएसटी घोटाळा असून वरील रक्कम १०० कोटी रुपयांहून अधिक असण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बार्देश तालुक्यात दोन आस्थापनांनाद्वारे जीएसटी घोटाळा होत असल्याची माहिती गोवा विभागाच्या जीएसटी डीजीजीआयला मिळाली होती. त्यानुसार, विभागाचे उपसंचालक शिबी सिंह गहरवार यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने प्राथमिक चौकशी केली. या चौकशीत बार्देश तालुक्यात शिवोली आणि म्हापसा परिसरात ‘संदीप होम अप्लायन्सेस’ आणि ‘अभिषेक होम अप्लायन्सेस’ या आस्थापनांकडून बनावट बिलांद्वारे जीएसटी घोटाळा होत असल्याचे समोर आले. विभागाने वरील दोन्ही आस्थापनांची माहिती मिळवली असता, दोन्ही कंपन्या बनावट असल्याचे दिसून आले. दोन्ही कंपन्या स्थापन करण्यासाठी संशयितांनी वरील घरमालक आणि दुकान मालकांसोबत भाडेपट्टीचा करार केला होता. त्यासाठी संशयितांनी बनावट आधार कार्ड आणि इतर दस्तावेज दिले होते. या घोटाळ्यात राजस्थान येथील अनेकजण सहभागी असून त्यात गोव्यातील काही आस्थापनांचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विभागाच्या चौकशीतून घोटाळ्यातील एक म्होरक्या चेन्नईत असल्याचे समजले. विभागाचे एक पथक चेन्नईत गेले. तेथे पथकाने पुखराज किशना राम (मूळ राजस्थान) याच्या मुसक्या आवळल्या. चेन्नईतील न्यायालयाकडून हस्तांतरण रिमांडवर त्याला गोव्यात आणून अटक केली. संशयित पुखराजला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने प्रथम जीएसटी विभागाची कोठडी ठोठावली. ती संपल्यानंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली. दरम्यान, संशयिताने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे.
घोटाळ्यात इतर राज्यांतील संशयितांचा सहभाग
जीएसटी चोरीसाठी गोव्यात स्थापन केलेली दोन्ही आस्थापने बनावट आहेत. त्यासाठी टोळीने बोगस आधार कार्ड, बँक खाते उघडले होते. बँक खात्याद्वारे इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावाही करण्यात येत होता. प्राथमिक चौकशीत सुमारे ४० कोटी रुपयांची जीएसटी चोरी झाल्याचे उघड झाले आहे. या घोटाळ्यात राजस्थान, गोवा, चेन्नई, महाराष्ट्र तसेच इतर राज्यांतील संशयितांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
संशयितांनी वापरलेल्या क्लृप्त्या...
बनावट बिल (इनव्हॉइसिंग) : वस्तू किंवा सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) दावा करण्यासाठी बनावट बिल (इनव्हॉइस) तयार करणे.
बनावट आयटीसी दावे : कधीही न भरलेल्या करांवर किंवा अपात्र खरेदीवर बेकायदेशीरपणे आयटीसी दावा करणे.
वस्तूंचे चुकीचे वर्गीकरण : कमी जीएसटी भरण्यासाठी जाणूनबुजून कमी कर दराखाली वस्तूंचे वर्गीकरण करणे.
विक्रीचे आकडे लपवणे : जीएसटी टाळण्यासाठी प्रत्यक्ष विक्रीचे आकडे लपवणे.