चौघे बिनविरोध : उर्वरित नऊ जागांसाठी मतदान
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोवा राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी रविवार, १७ ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. राज्यभरात १२ मतदान केंद्रांवर सुमारे ३३ हजार मतदार मतदानाचा अधिकार बजावतील. मतदान सकाळी ९ ते सायं. ५ या वेळेत होणार आहे. निवडणुकीचा निकाल मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी जाहीर केला जाणार आहे. संचालक मंडळाच्या एकूण १३ पैकी ४ जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित ९ जागांसाठी रविवारी चुरशीने मतदान होण्याची अपेक्षा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेवा गटातील सहकारी संस्थांच्या ३ जागांसाठी ४ उमेदवार रिंगणात आहेत. डेअरी गटातील एका जागेसाठी २, अन्य गटातील एका जागेसाठी २, ग्राहक आणि मार्केटिंग गटाच्या एका जागेसाठी २ उमेदवार रिंगणात आहेत. वेतन गटात उत्तर आणि दक्षिण गोव्यात प्रत्येकी एक जागा आहे. यासाठी दोन्ही मतदासंघांत दोन उमेदवार लढत आहेत. निवडणुकीत दादी नाईक, वासुदेव परब, संजय देसाई, प्रिया टांकसाळे, प्रकाश वेळीप आपले नशीब आजमावत आहेत.
मतदान बँकेच्या पेडणे, म्हापसा, पणजी, डिचोली, सांगे, केपे, काणकोण, वास्को येथील शाखेत होईल. तसेच वाळपई सरकारी शाळा, सहकार भवन, कुर्टी -फोंडा, धारबांदोडा मल्टीपर्पज सोसायटी-धारबांदोडा आणि फातोर्डा येथील साहाय्यक सहकारी निबंधक कार्यालय येथेही मतदान होणार आहे. याआधी मागील संचालक मंडळाच्या कालावधीविषयी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. यानंतर सहकार निबंधकांनी बँकेवर तीन सदस्यीय प्रशासकीय समितीची स्थापना केली होती.
पांडुरंग कुर्टीकरांना चंद्रशेखर कुसनूरांचे आव्हान
यंदा थेट पॅनल नसले तरी दोन गटांत चुरशीने लढत होण्याची शक्यता आहे. काही उमेदवार रात्री उशिरापर्यंत मतदारांशी संपर्क साधत होते. वैयक्तिक गटात याआधीच्या संचालक मंडळाच्या जवळचे समजले जाणारे पांडुरंग कुर्टीकर निवडणूक लढवत आहेत. त्यांना चंद्रशेखर कुसनूर यांनी आव्हान दिले आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.