सलग तीन दिवस पावसाचा कहर; जनजीवन विस्कळित

नागरिकांना सतर्कतेचा इशारा : करंजाळेत चारचाकीचे नुकसान, उद्योग भवनाचा सज्जा कोसळला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17 hours ago
सलग तीन दिवस पावसाचा कहर; जनजीवन विस्कळित

पणजी : गोव्यात मंगळवारीही पावसाचा जोर कायम राहिल्याने अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. करंजाळे येथे झाड पडून एका चारचाकी वाहनाचे नुकसान झाले, तर पणजीतील उद्योग भवन इमारतीचा सज्जा कोसळला. सोमवारी रात्री म्हापसा येथील इनडोअर स्टेडियमच्या छताचे सिलिंग कोसळले होते. पावसामुळे सलग तिसऱ्या दिवशी जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक रस्ते जलमय झाले आहेत.
हवामान खात्याने मंगळवारी सुरुवातीला यलो अलर्ट जारी केला होता, जो नंतर बदलून ऑरेंज अलर्ट करण्यात आला. दिवसभर पणजीसह अनेक भागांत पावसाची संततधार सुरू होती. जोरदार सरींमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. पणजीमध्ये सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत १.४३ इंच पावसाची नोंद झाली, तर मोपा येथे १.८३ इंच पाऊस पडला.
मंगळवारी सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांत राज्यात सरासरी ३ इंच पावसाची नोंद झाली. यामध्ये सांगे (५.५३ इंच), केपे (४.६० इंच), काणकोण (४.१६ इंच), मडगाव (४.०५ इंच), धारबांदोडा (३.३१ इंच) आणि पेडणे (२.९७ इंच) या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. हवामान खात्याने पुढील दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला असून, २० आणि २१ ऑगस्ट रोजी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

तिलारी नदीला धोका
या मुसळधार पावसामुळे तिलारी नदीची पाणी पातळी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली आहे. तिलारी धरण प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून, पुढील २४ तासांत नदीपात्रात कोणीही उतरू नये असे आवाहन केले आहे.
पाच केंद्रात पावसाने गाठले शतक
राज्यात १ जून ते १९ ऑगस्ट या कालावधीत सरासरी ९४.७९ इंच पावसाची नोंद झाली आहे. यंदा पावसाचे प्रमाण ३.३ टक्क्यांनी कमी असले तरी, धारबांदोडा (१२६.२२ इंच), सांगे (१२४.०९ इंच), वाळपई (१२०.८४ इंच), केपे (११५.३६ इंच) आणि फोंडा (१००.५५ इंच) या पाच केंद्रांनी १०० इंचांपेक्षा जास्त पावसाची नोंद करून 'शतक' पूर्ण केले आहे.
मासेमारीवर परिणाम, ताज्या माशांची टंचाई
गोव्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि समुद्रातील वादळामुळे स्थानिक मासेमारी पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी, बाजारात ताज्या माशांची मोठी टंचाई निर्माण झाली असून, गोमंतकीयांना माशांशिवाय जेवण करण्याची वेळ आली आहे, अशी माहिती गोवा ट्रॉलर मालक संघटनेचे अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी दिली.
हवामानातील बदलांमुळे मासेमारी व्यवसाय अडचणीत
गेल्या १ ऑगस्टपासून सुरू झालेला मासेमारीचा हंगाम नारळी पौर्णिमेनंतर अधिकच अडचणीत आला आहे. समुद्रातील वातावरण सतत अस्थिर असल्यामुळे आणि मोठ्या लाटा उसळत असल्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून ट्रॉलर आणि मासेमारी बोटी बंदरावरच नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. डिसोझा यांच्या मते, समुद्रात मासे असले तरी खराब हवामानामुळे ते पकडणे शक्य होत नाही. सध्या बाजारात जे मासे उपलब्ध आहेत, ते इतर राज्यांतून आयात केलेले आहेत आणि त्यांचे प्रमाण खूप कमी आहे. यामुळे, माशांच्या किमतीही वाढल्या आहेत. जुझे डिसोझा यांनी सांगितले की, सध्याचा हंगाम निराशाजनक असला तरी, येत्या काही दिवसांत हवामान स्थिर झाल्यास आणि समुद्र शांत झाल्यास मासेमारी व्यवसायाला पुन्हा गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे.