पांडुरंग कुर्टीकरांना अध्यक्षपदाची संधी
पणजी : गोवा राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सरकार समर्थक उमेदवारांनीच बाजी मारली आहे. बहुसंख्य गटात सरकार समर्थक उमेदवार विजयी झाले. माजी मंत्री प्रकाश वेळीप यांचा या निवडणुकीत पराभव झाला. ग्राहक सहकारी संस्था गटात श्रीकांत नाईक यांनी त्यांचा पराभव केला. महिन्याभरात अध्यक्षांची निवड होईल. सर्वसामान्य वैयक्तिक गटातून निवडून आलेले पांडुरंग कुर्टीकर यांचे नाव बँकेच्या अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे.
सरकारला पाठिंबा असणारे बहुसंख्य उमेदवार विजयी झाले आहेत. नवनिर्वाचित संचालकांच्या बैठकीतच अध्यक्षपदाचा उमेदवार ठरणार आहे, अशी माहिती विजयी उमेदवार विनायक नार्वेकर यांनी दिली.
गोवा राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी रविवारी निवडणूक झाली तर आज फोंडा येथील सहकार भवन इमारतीत मतमोजणी झाली. श्रीपाद परब, प्रभाकर गावकर यांच्यासह चार संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत.
दरम्यान, या निवडणुकीत अधिकृतपणे पॅनल नव्हते, पण सत्ताधारी गटाच्या उमेदवारांनी एकमेकांसाठी प्रचार केला होता. पांडुरंग कुर्टीकर हे कोठंबी-पाळी येथील असून ते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या गटातील असल्यामुळे सुरुवातीपासून निवडणूक जिंकल्यास अध्यक्षपदासाठी त्यांचेच नाव पुढे येईल, असे स्पष्ट होते.
निवडणुकीतील विजयी उमेदवार :
सेवा सहकारी संस्था गट
- कृष्णा कुडणेकर,
- विठ्ठल वेर्णेकर,
- विनायक नार्वेकर
पगारदार सेवा सहकारी संस्था
- प्रिया टांकसाळी
- शाबा देसाई
ग्राहक सहकारी संस्था गट
- श्रीकांत नाईक
दुग्ध सहकारी संस्था
- विजयकांत गावकर
गृहनिर्माण संस्था गट
- दादी नाईक
सर्वसामान्य वैयक्तिक गट
- पांडुरंग कुर्टीकर