पांडुरंग कुर्टीकर गोवा राज्य बँकेचे नवे अध्यक्ष शक्य

संचालक मंडळ निवडणुकीत भाजपची सरशी : प्रकाश वेळीपांचा पराभव

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17 hours ago
पांडुरंग कुर्टीकर गोवा राज्य बँकेचे नवे अध्यक्ष शक्य

गोवा राज्य सहकारी बँकेच्या निवडणुकीत निवडून आलेले नवीन संचालक मंडळ.

फोंडा : गोवा राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजप समर्थकांनी वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत बहुतांश गटांमध्ये सरकार समर्थक उमेदवार विजयी झाले आहेत. यामुळे, आता बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे कोणाच्या हाती येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या पदासाठी सर्वसामान्य वैयक्तिक गटातून निवडून आलेले पांडुरंग कुर्टीकर यांचे नाव आघाडीवर आहे.
गोवा राज्य सहकारी बँकेच्या नूतन संचालक मंडळासाठी सदर निवडणूक रविवारी पार पडली होती, तर मंगळवारी फोंडा येथील सहकार भवन इमारतीत मतमोजणी झाली. या निवडणुकीत भाजपच्या अप्रत्यक्ष पाठिंब्याने बहुतांश उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत पांडुरंग कुर्टीकर यांनी वैयक्तिक गटात चंद्रशेखर खैसूर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. कुर्टीकर यांना १२०२ मते मिळाली, तर खैसूर यांना केवळ १५२ मतांवर समाधान मानावे लागले.
प्रकाश वेळीप यांचा पराभव
या निवडणुकीतील एक मोठा धक्का म्हणजे माजी सहकार मंत्री प्रकाश वेळीप यांचा झालेला पराभव. ग्राहक सहकारी संस्था गटातून श्रीकांत नाईक यांनी त्यांना मात दिली. वेळीप यांनी अलीकडच्या काळात भाजपविरोधी केलेली वक्तव्येच त्यांच्या पराभवाचे कारण ठरली, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.


अध्यक्षाची निवड लवकरच
यापूर्वीच श्रीपाद परब, प्रभाकर गावकर यांच्यासह चार संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. नवनिर्वाचित संचालक विनायक नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयी उमेदवारांमध्ये बहुसंख्य उमेदवार हे सरकार समर्थक आहेत. त्यामुळे आता नवनिर्वाचित संचालकांच्या बैठकीतच अध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित केला जाईल. पांडुरंग कुर्टीकर हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या गटातील मानले जातात, त्यामुळे त्यांचे अध्यक्षपद निश्चित मानले जात आहे.
बिनविरोध निवडलेले उमेदवार
या निवडणुकीत काही गटांमधून उमेदवार बिनविरोध निवडून आले. श्रीपाद परब यांची नागरी गटातून, तर चित्रा वायंगणकर आणि मैथिली परब यांची महिला संचालक पदासाठी बिनविरोध निवड झाली. याशिवाय, अनुसूचित जाती-जमाती विभागात प्रभाकर गावकर बिनविरोध विजयी झाले आहेत.
विजयी आणि पराभूत उमेदवार
* सेवा सहकारी संस्था गट : विनायक नार्वेकर (४२), विठ्ठलदास वेर्णेकर (४२), आणि कृष्णा कुडणेकर (३९) हे विजयी झाले, तर उपासो गावकर (२०) यांचा पराभव झाला.
* ग्राहक सहकारी संस्था गट : श्रीकांत नाईक (१६) विजयी झाले, तर प्रकाश शंकर वेळीप (६) यांचा पराभव झाला.
गृहनिर्माण संस्था गट : दादी नाईक (५७) विजयी, वासुदेव परब (५१) पराभूत.
दुग्ध सहकारी संस्था : विजयकांत गावकर (३३) विजयी, रमेश एडथदान (२९), विकास प्रभू (२३) पराभूत
पगारदार सोसायटी (उ..गोवा): प्रिया टंकसाळी (४१) विजयी, रामा चोर्लेकर (३५) पराभूत.
पगारदार सोसायटी (द. गोवा) : शाबा सावंत देसाई (३७) विजयी, संजय देसाई (२७) पराभूत.
सर्वसामान्य व्यक्तिगत गट : पांडुरंग कुर्टीकर (१२०२) विजयी, चंद्रशेखर खैसूर (१५२) पराभूत