वास्कोत पोलिसांना मारहाण; सहा जणांना अटक

सर्व संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद : कायदा, सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17 hours ago
वास्कोत पोलिसांना मारहाण; सहा जणांना अटक

वास्को : रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या युवकांना हटकल्यामुळे वास्कोत मंगळवारी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास तीन पोलिसांना मारहाण झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेनंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वास्को पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी सहा जणांना रात्री ‌उशिरा अटक करण्यात आली तर एक फरार आहे.
मंगळवारी मध्यरात्री सव्वा तीनच्या सुमारास एका आरोपीला घेऊन पोलीस जीप चिखली रुग्णालयात जात होती. वाडे येथील किंगस्टोन प्लाझासमोर काही युवक वाहनांसह रस्त्यावर उभे होते. पोलिसांनी त्यांना रस्ता मोकळा करण्याची विनंती केली असता, त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी गणेश गावकर, नरेश गायकवाड आणि चालक चंद्रहास मुरुडकर जखमी झाले. जखमी झालेल्या गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
या घटनेची माहिती मिळताच इतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पण, तोपर्यंत हल्लेखोरांनी पळ काढला होता. वास्को पोलिसांनी शोधमोहीम राबवून संजय करभांटकर (२५,साईनंगर, मांगोरहिल), राज तारकर (३०, मारूती मंदिर मांगोरहिल) यांसह सहा जणांना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे. पोलिसांनी सर्व संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, हल्लेखोरांपैकी एक जण खून प्रकरणातील संशयित असल्याचेही समोर आले आहे.
स्थानिक आमदारांचे दोषींवर कारवाईचे आदेश
या घटनेनंतर वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले की, कायदा हातात घेणाऱ्या कोणत्याही गुंडांना सोडले जाणार नाही. दुसरीकडे, काँग्रेस नेत्यांनी या घटनेचा निषेध करत वास्कोतील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचा आरोप केला आहे.