रुमडामळ येथील बेकायदा मदरशावर पोलिसांची कारवाई; १७ मुलांची सुटका

गोव्यासह कर्नाटक, बिहारमधील मुलांचा समावेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19th August, 03:30 pm
रुमडामळ येथील बेकायदा मदरशावर पोलिसांची कारवाई; १७ मुलांची सुटका

मडगाव : रुमडामळ, हाउसिंग बोर्ड येथे कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय सुरू असलेल्या एका बेकायदेशीर मदरशावर मायना-कुडतरी पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत गोवा, कर्नाटक आणि बिहारमधील एकूण १७ मुलांची सुटका करण्यात आली आहे. या मुलांकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे किंवा आधार कार्ड सापडलेले नाहीत, त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पोलिसांना मदरशात १७ मुले आढळल्यानंतर, त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी तातडीने बाल कल्याण समितीशी (सीडब्ल्यूसी) संपर्क साधण्यात आला. मुलांवर कोणताही मानसिक आघात होऊ नये यासाठी त्यांना रात्री त्याच ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली.
सध्या पोलीस या मुलांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. हा मदरशा यापूर्वी दुसऱ्या ठिकाणी होता आणि स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर त्याचे ठिकाण बदलण्यात आले होते, अशी माहितीही तपासात समोर आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, पोलीस पुढील माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.मायना कुडतरी पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर केलेल्या तपासात मदरशात असलेल्या मुलांचे आधारकार्ड किंवा इतर कोणतीही कागदपत्रे आढळून आलेली नाहीत. या मुलांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. हा मदरशा आधीपासून सुरू होता व स्थानिकांच्या तक्रारीनंतर याची जागा बदलण्यात आलेली होती. याठिकाणी संशयास्पद कृती होत असल्याच्या शंका स्थानिकांनी व्यक्त केल्या होत्या. मायना कुडतरी पोलिसांच्या तपासात सध्या गोव्यासह कर्नाटक व बिहार येथील मुले असल्याचे समोर आलेले आहे.
स्थानिकांच्या तक्रारीनंतर कारवाई
रुमडामळ येथील अंजुमन हायस्कूलच्या मागील बाजूला असलेल्या एका निळ्या इमारतीत हा मदरशा चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. स्थानिकांनी या ठिकाणी काही संशयास्पद हालचाली होत असल्याची तक्रार केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या तक्रारीनंतर सोमवारी रात्री पोलिसांनी या मदरशाची पाहणी केली आणि कारवाईचा निर्णय घेतला.