होंडा-वाळपई येथे कौटुंबिक वादातून केली होती हत्या
पणजी : २०१६ मध्ये होंडा-वाळपई येथे कौटुंबिक वादातून आपल्या २० वर्षीय मुलीची हत्या केल्याप्रकरणी आणि दुसऱ्या मुलीवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी बाल न्यायालयाने आरोपी पिता शंकर रेड्डी याला दोषी ठरवले आहे. बाल न्यायालयाचे अध्यक्ष सई प्रभुदेसाई यांनी हा आदेश दिला आहे.
१ जून २०१६ रोजी शंकर रेड्डी याने रागाच्या भरात आपली मोठी मुलगी सुजाता हिच्यावर कोयत्याने हल्ला केला. तिला वाचवण्यासाठी धावलेल्या धाकट्या मुलगी गौरीवरही त्याने वार केले. या हल्ल्यात सुजाताचा जागीच मृत्यू झाला, तर गौरी गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच तत्कालीन पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली वाळपई पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
हल्ल्यानंतर पळून गेलेल्या शंकर रेड्डीला पोलिसांनी २ जून २०१६ रोजी अटक केली. तपास पूर्ण करून पोलिसांनी त्याच वर्षी बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सरकारी अभियोक्ता कृष्णा संझगिरी, मिलेना पिंटो आणि थेमा नार्वेकर यांनी बाजू मांडताना, हल्ल्यासाठी वापरलेल्या कोयत्यावर आणि घटनास्थळी सापडलेल्या रक्ताच्या नमुन्यांचा अहवाल सकारात्मक आल्याचा युक्तिवाद केला. याशिवाय, हल्ल्यातून बचावलेल्या गौरीने दिलेली साक्षही या प्रकरणात महत्त्वाची ठरली. सर्व पुरावे आणि वैद्यकीय अहवालाची तपासणी केल्यानंतर न्यायालयाने शंकर रेड्डीला दोषी ठरवले आहे.