औषधांचे जादा डोस घेतल्याचा अंदाज
प्रिया कार्तिक
प्रतिनिधी। गोवन वार्ता
बेळगाव : येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील एका वैद्यकीय विद्यर्थिनीचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. सदर विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे कॉलेजच्या सूत्रांनी सांगितले. बेळगावी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (बिम्स) मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेली प्रिया कार्तिक (बेंगळुरू, २७) सोमवारी रात्री तिच्या कॉलेजच्या वसतिगृहात मृतावस्थेत आढळली.
प्रिया कार्तिक मानसोपचारात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत होती. ती रुग्णालयाच्या आवारात असलेल्या बिम्स वसतिगृहात तिच्या खाेलीत मृतावस्थेत आढळली. तिच्या वसतिगृहातील मित्रांनी तिला तत्काळ आपत्कालीन आणि ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. प्राथमिक वैद्यकीय तपासणीनुसार, नैराश्यासाठी घेत असलेल्या औषधांचे जादा डोस घेतल्याने मृत्यू झाला असल्याचे दिसून आले आहे.
बिम्सचे संचालक डॉ. अशोक कुमार शेट्टी यांनी ट्रॉमा सेंटरला भेट दिल्यानंतर पत्रकारांना सांगितले की, प्रिया सोमवारी दुपारी ४.३० पर्यंत तिच्या ड्युटीवर होती. ती वसतिगृहात परतल्यानंतर ही अनुचित घटना घडली. यापूर्वीही तिने धारदार ब्लेडने नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्यावर बेंगळुरू मेडिकल कॉलेजमध्ये उपचार करण्यात आले होते. बिम्सच्या अधिकाऱ्यांनी येथील एपीएमसी पोलीस स्थानकात संशयास्पद आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे.