वाडे वास्कोत क्रिकेट सट्टेबाजीचा पर्दाफाश

सायबर गुन्हे पोलिसांकडून बिहारमधील तिघांना अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th August, 11:53 pm
वाडे वास्कोत क्रिकेट सट्टेबाजीचा पर्दाफाश

म्हापसा : वाडे वास्को येथील एका कॉलनीमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट बेटिंग सट्टेबाजीचा पर्दाफाश सायबर गुन्हे विभागाने केला. याप्रकरणी बिहारमधील तिघांना अटक करुन सुमारे ४ लाख रुपये किमतीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

रवींद्र कुमार शर्मा (रा. बिहार), सुनील कुमार (रा. बिहार) व बिरेंद्र कुमार मोंडल (रा. बिहार) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

ही कारवाई सायबर गुन्हे विभागाने शुक्रवार दि. १५ रोजी रात्री केली. वाडे वास्को येथील एका धनवंतांच्या कॉलनीमधील बंगल्यात क्रिकेट सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलीस पथकाने सदर बंगल्यावर छापा टाकून संशयितांना पकडून ताब्यात घेतले. यावेळी बेटिंग सुरू होती.

सट्टेबाजीसाठी त्यांच्या क्रमांकावर संपर्क साधणार्‍यांचे कॉल्स ते आपल्या साथीदारांकडे वळवत (डायव्हर्ट) होते. देशी तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवर ही बेटिंग लावली जात होती. संशयित आरोपी हे वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे असलेल्या सीमकार्डचा वापर या गुन्ह्यासाठी करत होते.

पोलिसांनी संशयितांकडून ११ मोबाईल, एक लॅपटॉप, दोन ऑडिओ मिक्सर, अशा वस्तू जप्त केल्या आहेत. संशयित आरोपींविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ क आणि गोवा सार्वजनिक जुगार प्रतिबंधक कायदा कलम ३ व ४ अन्वये गुन्हा नोंद करुन त्यांना पोलिसांनी अटक केली.

सायबर गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर, उपनिरीक्षक नवीन नाईक, मंदार देसाई व सहकारी पथकाने ही कामगिरी केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत. 

हेही वाचा