गाडी अडवून तलवार, कोयत्याने केला होता हल्ला
मडगाव : मुंगूल फातोर्डा येथील गँगवॉरच्या घटनेत फातोर्डा पोलिसांनी गुरुवारी सुनील बिलावर (२०, रा. घोगळ, मडगाव) या आणखी एका संशयिताला अटक केली आहे. यापूर्वी आठजणांना अटक केलेली असून त्यांना पोलीस कोठडी सुनावलेली आहे.
मुंगूल माडेल येथे गाडी अडवून तलवार, कोयता, सोडा बॉटल्सचा वापर करत हल्ला केल्याने रफीक ताशान (२४) व युवकेश सिंग बदैला (२०) हे गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यावेळी बंदुकीने गोळीबारही करण्यात आला. दोन गँगमधील पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला. दक्षिण गोवा पोलिसांनी पाच संशयितांविरोधात लुकआऊट नोटीस काढली. फातोर्डा पोलिसांनी यानंतर संशयितांवर अटकेची कारवाई केली होती. यापूर्वी संशयित विल्सन कार्व्हालो, शाहरुख शेख (रा. दवर्ली), रसूल शेख (रा. मडगाव) यांच्यानंतर मोहम्मद अली (२४), वासू कुमार (२४), सूरज माझी (१९), मलिक शेख (१८), गौरांग कोरगावकर (२४) यांना अटक केली होती. आठही संशयितांना न्यायालयात हजर केल्यानंतर सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याच प्रकरणात आता सुनील बिलावर या घोगळ मडगाव परिसरात राहणार्या संशयिताला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर करत कोठडीची मागणी केली जाणार आहे.
तक्रारदारांच्यावतीने या प्रकरणात मध्यस्थी अर्ज दाखल करण्यात आला आहे. अॅड. लिओन मोंतेरो यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अनेक कंगोरे आहेत. खर्या गोष्टी दाखवण्यात येत नाहीत. दक्षिण गोव्यात वाढलेला ड्रग्ज व्यवसाय थांबवण्याचा प्रयत्न करणार्यांवर ड्रग्ज डिलर्सकडून हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली. पोलीस या प्रकरणी तपास करतील. न्यायालयात आमचे म्हणणे मांडू, असेही त्यांनी सांगितले.
ड्रग्ज व्यवसायातील वर्चस्वासाठी हल्ला?
या प्रकरणातील हल्ला करत जखमी करण्यात आलेले रफीक व युवकेश हे दोघेही वॉल्टर गँगशी संबंधित आहेत. मारहाण करणार्या गटाकडून वॉल्टर गँगचे वर्चस्व कमी करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला.