जर तुम्ही कृष्णाच्या मार्गावर चाललात, त्याने स्वतःच्या आत निर्माण केलेली शक्यता जर तुम्ही निर्माण केली, तर गीता तुमच्यासाठी एक वास्तव बनते. तोपर्यंत, कोणीही बोलून ठेवलेल्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका.
सद्गुरू स्पष्ट करीत आहेत की, कृष्णाच्या मार्गावर चालणे म्हणजे धर्मग्रंथ वाचणे किंवा धर्म समजून घेणे नव्हे- तर स्वतःच्या अंतरंगात कृष्ण बनणे होय.
सद्गुरू : तुम्ही किती प्रमाणात जिवंत आहात, तेवढ्याच प्रमाणात तुम्ही जीवन जाणू शकता. सध्या, जर तुम्ही केवळ शारीरिकदृष्ट्या जिवंत असाल, तर तुम्ही केवळ भौतिक जीवन जाणू शकता. जर तुम्ही मानसिकदृष्ट्या जिवंत असाल, तर तुम्ही थोडेसे बौद्धिक जीवन जाणू शकता. जर तुम्ही भावनिकदृष्ट्या जिवंत असाल, तर तुम्ही थोडेसे भावनिक जीवन जाणू शकता. त्याचप्रमाणे, जर तुम्ही इतर आयामांमध्ये जिवंत असाल, तर तुम्हाला त्या आयामात जिवंतपणा किंवा जीवन जाणता येईल.
तुम्ही जिवंत होईपर्यंत, जर तुम्ही कोण काय म्हणतो यावर विश्वास ठेवू लागला - तो कृष्ण असो की इतर कोणी - तर ती फक्त एक कथा आहे. आपण काय बोलत आहोत ते कृष्णाला माहीत होते, पण तुम्हाला माहीत नाही, कारण जोपर्यंत तुम्ही जीवन त्याने जसे अनुभवले तसे अनुभवत नाही, तोपर्यंत तुम्हाला तो कशाविषयी बोलतो आहे ते कळणार नाही. फक्त एक प्रेरणा म्हणून तुम्ही त्याच्या जीवनाचा, त्या मार्गावर चालण्यासाठी उपयोग करू शकता. तुम्ही त्याचे शब्द उचलून हे खरे आहे, असे म्हणू शकत नाही. कारण ते खरे नाही. जोपर्यंत आपल्या अंतरंगात तुम्ही कृष्ण बनत नाही, तोपर्यंत भगवत गीता खरी नाही. तिच्यावर विश्वास ठेवल्याने आणि तिची स्तुती केल्याने ती तुमच्यासाठी खरी बनत नाही. केवळ जेव्हा तुम्ही तसे बनता, तेव्हाच ती खरी होते.
गीता, बायबल, कुराण, जे काही त्यांनी लिहिले, ते असेच आहे - एके दिवशी कोणी एक माणूस समुद्र किनारी गेला आणि पहाटेची किनाऱ्यावरची झुळूक इतकी मस्त होती, की त्याला खूप आनंद वाटला. जेव्हा तुम्हाला खरोखर काही सुंदर अनुभवायला मिळते तेव्हा ते दुसऱ्यांना सांगण्याची तुमची इच्छा असते, नाही का? जेव्हा तुम्ही एक चांगला विनोद ऐकता, तेव्हा स्वतःभोवती ब्लॅंकेट लपेटून तो तुम्ही स्वतःलाच सांगत नाही. तो दुसऱ्या कुणाला सांगण्याची तुमची इच्छा असते. तर या माणसाला, जिच्यावर त्याचे प्रेम आहे, अशा व्यक्तीला ही गोष्ट सांगायची होती. आणि ही व्यक्ती दवाखान्यामध्ये आजारी होती आणि समुद्रकिनारी येऊ शकत नव्हती. पण हा मनुष्य ही गोष्ट सांगायला एवढा उत्सुक होता की, त्याने शवपेटीच्या आकाराची एक पेटी घेतली, त्यामध्ये ही वाऱ्याची सुंदर झुळूक कोंडली, पेटी सील केली आणि एका चिठ्ठीसह दवाखान्यात पाठवली.
पेटी दवाखान्यामध्ये पोहोचली. असे म्हणूया की, तुम्हीच ती दवाखान्यातील व्यक्ती आहात. आता तुम्ही दोन गोष्टी करू शकता. तुम्ही अतिशय काळजीपूर्वक पेटी उघडू शकता, पेटीच्या आत जाऊन ती वाऱ्याची सुंदर झुळूक अनुभवू शकता. किंवा तुम्ही ती चिठ्ठी वाचून, पुरेसे बरे वाटल्यावर, तो मनुष्य गेला त्याच मार्गाने जाऊन, त्या जागी पोहोचून, तिथली सुंदर झुळूक अनुभवू शकता. तर तुमच्यासमोर हे दोन पर्याय आहेत.
सर्व धर्मग्रंथ म्हणजे केवळ या पेट्या आहेत. कुणाला तरी त्याच्या अंतरंगात प्रचंड मोठा अनुभव आला आणि त्याची तो दुसऱ्याला सांगण्याची इच्छा झाली. उत्सुकतेपोटी ते एक तर बोलले किंवा त्यांनी लिहिले किंवा काहीतरी केले. पण तुम्ही तो ग्रंथ पवित्र समजून तुमच्या डोक्यामध्ये वागवीत आहात आणि धर्मग्रंथाच्या नावाखाली आणखी मूर्ख बनत आहात. ज्या मार्गाने कृष्णा गेला, त्या मार्गाने जर तुम्ही गेलात तर ते किती सुंदर राहील! पण ज्या क्षणी भगवत गीता तुमच्या डोक्यामध्ये शिरते तुम्ही मूर्ख बनता. असे खूप लोक आहेत जे भगवत गीता डोक्यात थेट शिरावी म्हणून तिला उशीखाली ठेवून झोपतात! जर तुम्ही भगवत गीता उशीखाली ठेवून झोपलात तर तुमची मान दुखेल, तुम्ही कृष्ण बनणार नाही.
जर तुम्ही कृष्णाच्या मार्गावर चाललात, त्याने स्वतःच्या आत निर्माण केलेली शक्यता जर तुम्ही निर्माण केली, तर गीता तुमच्यासाठी एक वास्तव बनते. तोपर्यंत, कोणीही बोलून ठेवलेल्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. याचा अर्थ असा नाही की तुम्ही अविश्वास दाखवावा. याचा अर्थ असा नाही की “कृष्णाचे बोलणे निरर्थक आहे”. नाही. ते तुम्हाला माहीत नाही. तुमच्या जाणिवेत आतापर्यंत न आलेल्या गोष्टींविषयी तो बोलतो आहे. “हा मनुष्य खूप साऱ्या गोष्टी सांगतो आहे, चला बघूया,” इतका खुलेपणा जर तुमच्यामध्ये असेल, तर शक्यता आहे.
कृष्ण बनणे म्हणजे काय? “मी प्रेम करावे की युद्ध करावे?” हा मुद्दा नाही. त्याने त्याच्या जीवनात जे काही केले ते परिस्थिती त्या स्वरूपाची होती म्हणून केले. संपूर्ण महाभारत हे उत्कट स्वरूपाचे नाट्य आहे, ज्यामध्ये लोक सर्व प्रकारच्या टोकाच्या परिस्थितीत आहेत. तिथे काही चांगले लोक आहेत. काही वाईट लोक आहेत. तेथे पूर्णपणे दुष्ट लोक आहेत आणि तिथे असामान्य अशी माणसे सुद्धा आहेत. तिथे सर्व प्रकारची माणसे आहेत. अगदी खालच्या स्तरापासून ते उच्च स्तरापर्यंतच्या मानवी चेतनेचे ते प्रकटीकरण आहे - तिथे प्रत्येक जण आहे. पण जेव्हा परिस्थिती तीव्रतेच्या एका विशिष्ट मर्यादेपलीकडे जाते, तेव्हा त्या सर्वांना दुःख भोगावे लागते. चांगल्यांना दुःख भोगावे लागते आणि वाईटांनाही भोगावे लागते. हे आहे महाभारत. सगळे जण - चांगला आणि वाईट - ज्या प्रकारच्या नाट्यामधून ते जात आहेत, त्याचे दुःख ते भोगत आहेत. पण कृष्ण एकमेव असा आहे, ज्याला या संपूर्ण नाट्यातून जाताना कुठल्याही दुःखाचा स्पर्श होत नाही.
कृष्णाचा मार्ग चालणे म्हणजे हेच आहे. जर तुमच्या जीवनाच्या नाट्यामधून तुम्ही कुठलेही दुःख न भोगता जाऊ शकलात, तर तुम्ही कृष्णाच्या मार्गावर आहात. जर तुम्ही शेजारच्या मुलीवर प्रेम करीत असाल तर तो कृष्णाचा मार्ग नाही; तुम्ही कोणासोबत युद्ध करीत असाल, तर तोही कृष्णाचा मार्ग नाही. कृष्णाचा मार्ग म्हणजे कोणत्याही नाट्यातून, त्याचा आपल्याला स्पर्श न होऊ देता, त्यातून जाणे. हाच कृष्णाचा मार्ग आहे.
- सद् गुरू
(ईशा फाऊंडेशन)