राष्ट्रध्वजाचा अवमान रोखणे प्रत्येकाचे कर्तव्य!

राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये यासाठी प्रत्येकाने सजग राहिले पाहिजे. कुठेही अशी कृती होत असल्यास संबंधिताला त्याच्या चुकीची जाणीव करून देऊन, सनदशीर मार्गाने अवमान रोखला पाहिजे.

Story: प्रासंगिक |
15th August, 12:22 am
राष्ट्रध्वजाचा अवमान रोखणे प्रत्येकाचे कर्तव्य!

आज १५ ऑगस्ट, भारताचा स्वातंत्र्यदिन. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय उत्सव आहेत. या दिवशी शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, हॉस्पिटल आदी ठिकाणी राष्ट्रध्वज डौलाने फडकत असतो. डौलाने फडकणारा तिरंगा पाहून प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून येतो. काही जणांकडून अनवधानाने म्हणा किंवा अतिउत्साहापोटी अशा कृती घडतात, ज्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. अशा कृती निदर्शनास आल्यास त्या त्वरित रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. राष्ट्रध्वजाचा मान राखणे प्रत्येक भारतीयाचे आद्यकर्तव्य आहे.

या दिवशी शालेय विद्यार्थी सकाळी लवकर ध्वजारोहणासाठी शाळेच्या मैदानावर दाखल झालेली असतात. ध्वजवंदन, राष्ट्रगीत, एनसीसी विद्यार्थ्यांची परेड, देशभक्ती वाढवणारी गीते, पाहुण्यांची भाषणे यामुळे बालमनावर देशप्रेमाचे संस्कार अधिक दृढ होतात.

भारताचा राष्ट्रध्वज तीन रंगांचा आहे. सर्वात वर केशरी, मध्यभागी पांढरा आणि खाली हिरवा रंग आहे. पांढर्‍या पट्ट्याच्या मध्यभागी निळ्या रंगाचे २४ आऱ्यांचे अशोकचक्र आहे. हा ध्वज २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने स्वीकारला आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तो अधिकृतपणे भारताचा राष्ट्रध्वज बनला. राष्ट्रध्वजातील रंगांचीही वैशिष्ट्ये आहेत. केशरी रंग शौर्य, त्याग आणि बलिदानाचे, पांढरा रंग शांती, सत्य आणि पावित्र्याचे, तर हिरवा रंग समृद्धी, सुजलाम्-सुफलाम् आणि निसर्गाचे प्रतीक आहे. अशोकचक्र हे गती आणि प्रगतीचे प्रतीक आहे. चक्रातील २४ आरे हे २४ सद्गुणांचे प्रतिनिधित्व करतात.

राष्ट्रध्वज हा देशाच्या सन्मानाचे आणि अभिमानाचे प्रतीक आहे. केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत घरोघरी राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे तिरंगा फडकवून भारतीय नागरिक राष्ट्राप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करतात. परंतु काही अतिउत्साही लोकांकडून अशा कृती होतात, ज्यामुळे तिरंग्याचा अवमान होतो. कदाचित त्यांचा अवमानाचा हेतू नसेलही. 

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या काळात प्लास्टिकचे छोटे राष्ट्रध्वज बाजार, ट्राफिक सिग्नल, बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसरात विक्रीसाठी येतात. काही लोक हे राष्ट्रध्वज खरेदी करून लहान मुलांना खेळण्यासाठी देतात, वाहनात लावतात, सदऱ्याला/साडीला लावतात. लक्षात घ्या, राष्ट्रध्वज हे खेळणे नाही. दोन-चार दिवसांनंतर उत्साह मावळला की मग या राष्ट्रध्वजांकडे दुर्लक्ष होते. ते कुठेही अक्षरशः जमिनीवर, कचऱ्यात, गटारात पडलेले आढळतात. काही जण राष्ट्रध्वजाचे चित्र असलेले कपडे खरेदी करतात. काही लोक या दिवशी राष्ट्रध्वजाचे चित्र रेखाटलेले केक कापतात. यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो.

राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये यासाठी प्रत्येकाने सजग राहिले पाहिजे. कुठेही अशी कृती होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधिताला त्याच्या चुकीची जाणीव करून देऊन, सनदशीर मार्गाने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखला पाहिजे. राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक भारतीयाचे आद्यकर्तव्य आहे. सतर्क राहा, सजग राहा आणि राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा!

प्रदीप जोशी

(लेखक दै. ‘गाेवन वार्ता’चे 

उप वृत्तसंपादक आहेत)