गेल्या काही वर्षांपासून भारत आणि चीन यांच्यातील संबंध तणावपूर्ण राहिले आहेत. विशेषतः गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये विश्वासार्हतेची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत, चीनने अचानक भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांनी भारताच्या दौऱ्यात भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली.
या भेटीत, चीनने भारताला काही महत्त्वाच्या वस्तूंचा पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे. यामध्ये दुर्मीळ मृदा, खते आणि बोगदा खोदणारी यंत्रसामग्री यांचा समावेश आहे. ही एक धोरणात्मक चाल आहे की दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सुधारणा करण्याची खरी सुरुवात आहे, यावर विविध स्तरांवर विचारमंथन सुरू आहे.
अमेरिकेने चीनच्या अनेक वस्तूंवर आयात शुल्क वाढवले आहे, ज्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर मोठा दबाव आला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून, चीनने ‘रेअर अर्थ मटेरियल’च्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. हे मटेरियल्स आधुनिक तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. याचा वापर इलेक्ट्रिक वाहनांपासून ते उच्च-तंत्रज्ञानाच्या उपकरणांमध्ये होतो.
या परिस्थितीचा थेट परिणाम अमेरिका आणि चीनवर अवलंबून असलेल्या इतर देशांवरही झाला आहे. अशा वेळी, चीनने भारताला या वस्तूंचा पुरवठा करण्याची तयारी दाखवणे ही एक दुहेरी चाल असू शकते. यामुळे एकीकडे भारत आणि चीनमधील व्यापाराला चालना मिळेल आणि दुसरीकडे चीन अमेरिकेला अप्रत्यक्षपणे संदेश देऊ शकेल की, त्याच्याकडे पर्यायी बाजारपेठा आणि मित्र देश आहेत. चीनचा हा डाव जागतिक भू-राजकारणात आपले स्थान कायम राखण्यासाठी आणि अमेरिकेचा दबाव कमी करण्यासाठी असू शकतो.
चीनच्या या प्रस्तावामुळे भारत आणि चीन यांच्यातील संबंधांमध्ये एक नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, केवळ व्यापार आणि आर्थिक संबंधांवर लक्ष केंद्रित करून सीमावादासारख्या संवेदनशील मुद्द्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. विश्वासार्हतेची पोकळी भरून काढण्यासाठी चीनला सीमावर्ती भागातील तणाव कमी करण्यासाठी ठोस पावले उचलावी लागतील. केवळ आर्थिक मदतीवर दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील अशी अपेक्षा करणे योग्य नाही. ही एक नाजूक परिस्थिती आहे, जिथे भारताला सावधगिरी बाळगावी लागेल. चीनच्या प्रस्तावाचा स्वीकार करताना, भारताला आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य द्यावे लागेल आणि चीनच्या दीर्घकालीन धोरणांचा विचार करावा लागेल.
- सचिन दळवी