आज आपण आपल्या पारंपरिक अन्न पदार्थांना झपाट्याने विसरत चाललो आहोत. आपल्या मुलांना परिपक्व काकडी किसून तांदळाचे पीठ आणि गुळ, खोबरे एकत्र करून तयार केलेल्या पारंपरिक तवसोळीची चव देणे शक्य आहे.
आज मानवी जीवनात धावपळ स्थायीभाव झालेली असून, 'अन्न हे पूर्णब्रह्म' असे मानणारे आपण फास्ट फुड, जंक फुड यांच्या आहारी गेलेलो आहोत. झटपट फास्ट फुड सेंटरवर जे काही चटपटीत उपलब्ध असेल, ते कसेतरी पटापट खायचे आणि पुन्हा मोटारसायकलवर स्वार होऊन भुर्रकन निघून जायचे किंवा कॉम्प्युटर, इंटरनेटमध्ये गुंतून जायचे, अशी धावपळ जणू काही आपली जीवनशैली बनलेली आहे. फास्ट फुड, जंक फुड हा तरुणाईसाठी जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. कमी खर्चात आणि कमी वेळेत तयार होणारे पदार्थ तरुणाईला आवडू लागल्यानेच आज मॅकडोनाल्ड, बर्गर किंवा पिझ्झा हट त्याचप्रमाणे चायनिज पदार्थ बनविणारी रेस्टॉरंट सेंटर यांची मोठ्या प्रमाणात चलती आहे.
तंतूमय प्रमाण अत्यल्प आणि साखरेचे प्रमाण जास्त यामुळे असे जंकफुड चयापचय अवस्थेवर ताण निर्माण करतात. अशा पदार्थात ट्रान्स फॅट म्हणजे तैल आणि चरबीयुक्त पदार्थांचा भरणा अधिक असतो. अशा पदार्थांच्या सेवनामुळे मेंदूतील संदेशवहन यंत्रणेवर दुष्परिणाम होत असल्याचे दिसून आलेले आहे. पुन्हा पुन्हा वापरण्यात आलेले तेल जंकफुडसाठी वापरले जात असल्याने अपचन, सतत ढेकर येणे, मूळव्याधसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. ट्रान्स फॅटयुक्त पदार्थांच्या सेवनाने कोलेस्टोरॉल आणि ट्रायग्लिसराईड यांचे प्रमाण ज्यादा होऊन रक्त वाहिन्यांसाठी अडचणी निर्माण होऊन हृदयविकारासारखे रोग होण्याची शक्यता असते.
आज तरुण मंडळीला त्याचप्रमाणे बालगोपाळांना त्यांच्या आई, आजी चिप्स आणि फ्रायम्ससारखे सहजपणे बाजारपेठेत उलपब्ध असणारे अन्नपदार्थ देण्यात धन्यता मानतात. चिप्स, फ्रायम्समध्ये अतिरिक्त मीठ असल्याने ते शरीरास घातक असते आणि त्यामुळे रक्तात जमा झालेले हे क्षार बाहेर टाकताना मूत्रपिंडावर ताण येतो. उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते. ट्रान्स फॅट असलेले पदार्थ आपल्या यकृतावर दुष्परिणाम करतात. अतिरिक्त शर्करा त्याचप्रमाणे ट्रान्सफॅट असणारे पदार्थ होण्याची शक्यता असते. जंकफुड सातत्याने खाल्ल्याने आतड्याचा कॅन्सर होण्याची शक्यता आहे.
वेळेत आणि कमी खर्चात तयार करणे शक्य असल्याने आज शाळा, महाविद्यालये, तीर्थक्षेत्रे, सरकारी कार्यालये असलेल्या ठिकाणी जंक, फास्ट फूड सहजपणे उपलब्ध असते. शाळेत जाणाऱ्या आपल्या मुलांना पालक झटपट तयार होणारे नुडल्स, ब्रेड, सॉसेजसारखे पदार्थ मधल्या सुट्टीत खाण्यास देणे प्रतिष्ठेचे मानतात. अशा पदार्थांच्या वारंवार सेवनामुळेच मुलांना थकवा येणे, अभ्यासारवर लक्ष केंद्रित न होणे, लठ्ठपणा, मधुमेहासारख्या दुष्परिणामांना सामोरे जाण्याची पाळी आलेली आहे. जंकफुडमध्ये पोषणमूल्यांचा अभाव असलेले घटक मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचप्रमाणे त्यात मैदा, स्वस्तातले तेल आणि शरीराला भरपूर कॅलरीज देणारे घटक असल्याने त्यांना पर्याय देणे, ही आपल्या समाजाची नितांत गरज आहे. नोकरदार महिला सकाळी दारात येणारे मैद्याचे पाव किंवा २-४ दिवसाअगोदर तयार केलेले स्लाईस ब्रेडबरोबर सॉस, जॅम देणे सोयीचे मानतात. त्यांनी नियोजनबद्ध आपल्या मुलांसाठी भारतीय अन्न संस्कृतीने दिलेले पदार्थ सकाळी डब्यात व्यवस्थित भरून देण्याची तसदी घेतली तर ही परिस्थिती निश्चित बदलू शकते. शेंगदाणे, काजूगर घालून गुळ आणि आंबवलेल्या तांदळाचे पोळे, सान्ना पिठापासून तयार केलेले नाचण्याचे सत्व, नाचण्याची आंबिल, नाचण्याची भाकरी, चपाती आणि आणि पुदिना, कोथंबीर, हिरवी मिरची, लसूण, आले, चिंच घातलेली चटणी देता येते. मोड आलेली मेथी, मुग यांच्यात कांदा, टॉमेटो, लिंबू रस घालून दिलेली न्याहरी आरोग्यवर्धक ठरू शकते. रासायनिक रंग न घालता गावठी तूप घालून केलेला शिरा, उप्पीट, थालीपीठ सारखे अन्न पदार्थ मुलांना आवडू शकतात. नाचण्याच्या पिठाच्या शेवया, शिरवळ्या केल्या जायच्या. ही परंपरा पुन्हा कार्यान्वित केली तर मुलांना त्यांचा आस्वाद देता येऊ शकतो. खांटोळी, खापरोळी, खिचडी, थालीपीठासारखे पदार्थ चवदारही लागतील आणि त्यांना पौष्टिक घटकदेखील प्राप्त होतील. शेंगदाणे, तीळ घालून गव्हाच्या पिठाचे पदार्थ तयार करणे शक्य आहे. महिलांनी कल्पकता आणि थोडेसे श्रम घेतले तर सकस, पौष्टिक अन्न पदार्थ मुलांना तयार करून देता येतात. गावोगावी असलेली स्थानिक महिला मंडळे, स्वयं साहाय्य गट यांची अन्नपदार्थ तयार करण्यासाठी मदत घेता येते. चिकी, खटखटे, चकल्या, शंकरपाळ्यांचा अधून मधून लाभ घेता येतो. काकड्या, सरफरचंद, जाम, मोसंबी, संत्री, केळीसारखी फळे न्याहरीसाठी मुलांना दिली, तर त्यांना फायदेशीर ठरेल.
आज आपण आपल्या पारंपरिक अन्न पदार्थांना झपाट्याने विसरत चाललो आहोत. आपल्या मुलांना दुकानातून विकत आणलेल्या केकची चव देताना जर परिपक्व काकडी किसून तांदळाचे पीठ आणि गुळ, खोबरे एकत्र करून तयार केलेल्या पारंपरिक तवसोळीची चव देणे शक्य आहे. काजूगर, पिस्ता आदी सुका मेवा त्यात घालून
तवसोळीच्या चवीची लज्जत वाढवणे आपणाला शक्य आहे. गोव्यात केपे तालुक्यातील काही ख्रिस्ती आदिवासी कुणबी कुटुंबियांत आजही मुटली, कोन, सान्ना यासारखे आंबवलेल्या तांदळापासून अन्न पदार्थ तयार केले जातात, त्यांचा आस्वाद आपल्या आप्तस्वकियांना फेस्त किंवा अन्य उत्सवांच्या प्रसंगी देण्याची परंपरा आहे.
आज प्लास्टिक, ट्रेटा पॅक आदींचे वेष्टन असलेले तेलात तळलेले, भाजलेले बरेच खारवलेले पदार्थ बाजारपेठेत आकर्षक स्वरूपात उपलब्ध आहेत. सुपर मार्केटात जाऊन त्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करून, एक पाकिट बंद पदार्थ मुलांना न्याहरीला देणे सोपी आणि सहज प्रक्रिया पालकांसाठी ठरलेली आहे. ऊर्जादायक आणि आनंदवर्धक अन्न पदार्थ घरात तयार करून देण्याऐवजी चाकरमानी आईवडील आपले कष्ट वाचवण्यासाठी पाकिट बंद पदार्थ देणे इष्ट मानतात. आज बाजारपेठेत एनर्जी ड्रिंकची चलती निर्माण झालेली असल्याने शारीरिक कष्टाचे व्यायाम केल्यावर अशी कृत्रिम शर्करायुक्त पेये पिण्यात तरुण आणि बाल्य, किशोर अवस्थेतील मुले प्राधान्य देत असतात. असे करून आपण शरीराला अपाय पोहचवणाऱ्या अन्न पदार्थ आणि पेये यांचे प्रस्थ समाजात निर्माण केलेले आहे, ही खरी चिंतेची बाब आहे.
प्रा. राजेंद्र केरकर
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५