ग्रँडमास्टर गुकेशच्या कामगिरीकडे लक्ष

Story: क्रीडारंग |
18th August, 10:08 pm
ग्रँडमास्टर गुकेशच्या कामगिरीकडे लक्ष

भारताचा जगज्जेता तरुण ग्रँडमास्टर दोम्माराजू गुकेश पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जलद व अतिजलद प्रकारातील निराशाजनक कामगिरीनंतर आता त्याचे लक्ष्य पारंपरिक स्वरूपातील सिंकेफिल्ड चषकावर असेल. सोमवारपासून सुरू झालेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत गुकेशसह भारताचा आणखी एक तडाखेबाज बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंद मैदानात आहे.

ही स्पर्धा ‘ग्रँड चेस टूर’मधील पाचवा टप्पा आहे. यंदाच्या हंगामातील प्रत्येक टप्पा महत्त्वाचा असला, तरी सिंकेफिल्ड कपला विशेष प्रतिष्ठा लाभली आहे. कारण, येथे जगातील अव्वल १०-१२ बुद्धिबळपटू एकमेकांविरुद्ध खेळतात.

मॅग्नस कार्लसन या वेळेस सिंकेफिल्ड चषकात खेळत नाही. कार्लसन नसल्यानेच गुकेश, कारुआना, फिरुझा, अरोनियन यांसारख्या खेळाडूंना जेतेपदाची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.

गुकेशसाठी ही वेळ अतिशय महत्त्वाची आहे. कारण, नुकत्याच झालेल्या सेंट लुइस जलद व अतिजलद स्पर्धेत तो सहाव्या स्थानी राहिला. त्या कामगिरीनंतर आता स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि पारंपरिक प्रकारातील आपली पकड मजबूत करण्यासाठी तो सिंकेफिल्ड कपमध्ये उतरत आहे.

सध्या एकूण गुणतालिकेत गुकेश पाचव्या स्थानी आहे. त्यामुळे सिंकेफिल्ड कपमध्ये उत्तम कामगिरी करून वर्षाअखेरीस होणाऱ्या अंतिम फेरीत स्थान मिळविण्याचे त्याचे लक्ष्य असेल. विशेष म्हणजे, या स्पर्धेत अव्वल ३-४ क्रमांकावर आलेल्या खेळाडूंना मोठा गुणात्मक फायदा मिळतो.

सिंकेफिल्ड चषकात भारतीय खेळाडूंसाठी स्पर्धा अजिबात सोपी नसेल. त्यांच्यासमोर खालील दिग्गजांची आव्हाने आहेत. फॅबियानो कारुआना (अमेरिका), लेव्हॉन अरोनियन (अमेरिका), अलिरेझा फिरुझा (फ्रान्स), वेस्ली सो, सॅम सॅव्हियन (अमेरिका), मॅक्सिम व्हॅचिएर-लाग्रेव्ह (फ्रान्स), यान-क्रिस्टोफ डुडा (पोलंड), नोदिरबेक अब्दुसत्तोरोव (उझबेकिस्तान). हे सर्व खेळाडू सध्याच्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीतील नामांकित असल्याने प्रत्येक डाव अत्यंत रोमहर्षक ठरणार आहे.

सिंकेफिल्ड चषक २०२५ मध्ये भारतीय बुद्धिबळपटूंकडून अपेक्षा मोठ्या आहेत. गुकेशकडे विश्वविजेता म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची उत्तम संधी आहे, तर प्रज्ञानंदकडे विजयमंचावर स्थान मिळवून जागतिक पटलावर आपली छाप आणखी ठळक करण्याची संधी आहे. 

कार्लसनच्या अनुपस्थितीत या दोघांपुढे मोठा मार्ग खुला झाला आहे. मात्र, कारुआना, फिरुझा, अरोनियन यांसारख्या खेळाडूंच्या आव्हानांना तोंड देत भारताचे हे तरुण शिलेदार किती यशस्वी ठरतात, हे पाहणे आता बुद्धिबळप्रेमींसाठी विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.

- प्रवीण साठे