लोकशाहीच्या मुलभूत मूल्यांचे रक्षण करणारी संस्था म्हणून आयोगाने काम करायला हवे. हे काम आयोग जेवढा पारदर्शक राहील तेवढे चांगले होईल. आयोगाबाबत लोकांना संशय येऊ लागला, तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच डळमळीत होऊन धोक्यात येईल.
विरोधकांनी निवडणूक आयोगावर शरसंधान केल्यानंतर आयोगाने विरोधकांचाही समाचार घेण्याचा प्रयत्न करत प्रतिज्ञापत्र सादर करून त्रुटींची माहिती द्यावी, असे आव्हान राहुल गांधी यांना दिले. त्यामुळे निवडणूक आयोग आणि इंडिया आघाडी सध्या समोरासमोर आहेत. कोण खरा आणि कोणाचा दावा खोटा, हे भविष्यात कधीतरी स्पष्ट होईल. पण सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला जी बिहारमधील ६५ लाख मतदारांची नावे वगळण्यात येतील, ती जाहीर करण्यासाठी मुदत दिली आहे. त्याकडे सध्यातरी सर्वांचे लक्ष आहे. या यादीनंतर काही गोष्टींचा निश्चितच खुलासा होऊ शकतो. सध्या आयोगाने विरोधकांच्या सर्व प्रश्नांची माहिती देण्याचा प्रयत्न केला असला तरी, संशयासाठी अनेक ठिकाणी रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूने विरोधक आता मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग आणण्याच्या विचारात आहेत. त्यातून निष्पन्न काही होणार नाही, पण आयोगाची प्रतिष्ठा मात्र कमी होत राहील. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी विरोधकांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावताना आयोगासाठी सर्वच राजकीय पक्ष समान असतात. कारण त्यांचा जन्मच मुळात आयोगाकडील नोंदणीने होतो, असा दावा केला. म्हणजे एखाद्या पालकाने एखाद्या मुलाला मारहाण करायची, दुसऱ्याचे लाड करायचे आणि कोर्टात उभे राहिल्यानंतर सर्व मुले माझीच आहेत, मी पक्षपातीपणा करू शकतो का, असा प्रश्न कोर्टाला विचारण्यासारखे आहे. आयोगाने अशा प्रकारचा दाखला देणेच मुळाच हास्यास्पद आहे. आयोगाने 'शून्य' घर क्रमांक असलेल्या मतदारांविषयी विचित्र खुलासा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या लोकांकडे घर नाही, जे पुलाखाली, रस्त्याच्या कडेला, अनधिकृत वस्त्यांमध्ये राहतात, त्यांना 'शून्य' घर क्रमांक दिलेला असतो. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, अशा लोकांबाबत आदर व्यक्त करणारा हा खुलासा असला तरी, अशा 'शून्य' घर क्रमांकाने बोगस मतदार किंवा एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदणी करणारे मतदार गैरफायदा उठवू शकत नाहीत का? निश्चितच उठवू शकतात. हे घर नसलेले लोक म्हणजे कोण? ते दुसऱ्या ग्रहावरून आलेले नाश्चितपणे नाहीत. घर सोडून गेलेले किंवा आपण ज्यांना अनाथ म्हणू, असे काहीजण यात असू शकतात. असे मतदार मतदान प्रक्रियेतील काही मोठ्या धोक्यांपैकी एक आहेत. खरी गरज होती ती निवडणूक आयुक्तांनी मतदार यादीचे 'शुद्धीकरण' कसे करता येईल, त्याबाबत सूचवण्याचे. पण त्याबाबत त्यांच्या पत्रकार परिषदेत काहीच दिसून आले नाही.
निवडणूक हा भारतीय लोकशाहीचा खरा आत्मा आहे. पारदर्शक, पक्षपातीपणाविरहित निवडणुकीत लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठीच निवडणुका आहेत. त्यामुळे त्या निवडणुकांमध्ये भाग घेणारे मतदारही तेवढेच पारदर्शक रहावेत. 'मतचोरी' म्हटली म्हणून लोकशाहीचा अवमान वगैरे होत असेल असे वाटत नाही. आयोगानेही तसे समजू नये. सर्वच मतदार आदर्श मानून निवडणूक आयोग चालत असला तरी निवडणूक काळात मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या करोडो रुपयांनी भरलेल्या गोण्या, भेटवस्तू याच कशासाठी जप्त होतात? मतपेट्यांची संस्कृती असताना कित्येक ठिकाणी एकच माणूस कितीतरी वेळा मतदान करायचा, असे प्रसंग आहेत. तेच टाळण्यासाठी मतदान यंत्रे आली. त्या यंत्रांचा वापर जसा चांगला व्हावा असे सर्वांना वाटते, तसेच निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारानेही एका निवडणुकीत एकदाच मतदान करावे, असे अपेक्षित आहे. त्यामुळेच आयोगाने विरोधकांच्या टीकेपेक्षा मतदान प्रक्रिया कशी सुधारता येईल, त्याकडे लक्ष द्यावे. त्यावर निवडणूक आयुक्तांनी भाष्य केले असते तर मतदान प्रक्रियेत सुधारणा होतेय, बोगस मतदारच राहणार नाहीत, हा संदेश जनतेपर्यंत गेला असता. बायोमेट्रिक, आधारला जोडणी सक्तीची करणे अशा गोष्टींवर चर्चा व्हायला हवी. हे पर्याय निवडायला हवेत. त्याचवेळी निवडणूक आयोगावरील लोकांचा विश्वास दृढ होईल. तेच लोकशाहीचे खरे बलस्थान असेल. लोकशाहीच्या मुलभूत मूल्यांचे रक्षण करणारी संस्था म्हणून आयोगाने काम करायला हवे. हे काम आयोग जेवढा पारदर्शक राहील तेवढे चांगले होईल. आयोगाबाबत लोकांना संशय येऊ लागला, तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच डळमळीत होऊन धोक्यात येईल.
मतदार याद्यांमधील त्रुटी, मतदान यंत्रांबाबत नेहमी घेतला जाणारा संशय, निवडणुकीच्याच काळात अज्ञात ठिकाणी मतदान यंत्रे सापडण्याचे प्रकार, निवडणुकीच्या काळात विरोधकांबाबत आयोगाकडून स्वीकारले जाणारे धोरण याबाबत विरोधकांची नेहमीच आयोगावर नाराजी दिसून आली आहे. त्यामुळेच संधी मिळेल तेव्हा आयोगाला उघडे पाडण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू असतात. आपल्यावर फक्त राजकीय हेतूने टीका होतेय, अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींकडे आयोगाने पाहू नये, त्याच्या खोलात जावे आणि स्वतःचे आत्मपरीक्षण करावे.