गेल्या काही दिवसांपासून युरोपातील आयर्लंडमध्ये भारतीय वंशाच्या लोकांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे दक्षिण आशियाई समुदायामध्ये मोठी चिंता पसरली आहे. गेल्या एका महिन्यात डब्लिन, क्लोंडालकिन, बॉलिमून आणि वॉटरफोर्डसारख्या भागांत भारतीयांवर सहा हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये पीडितांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर वांशिक शिवीगाळही करण्यात आली. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय वंशाचे लोक आयर्लंडमध्ये वांशिक हिंसाचाराच्या विरोधात निदर्शने करत आहेत.
या घटनांमुळे केवळ भारतीयच नव्हे तर नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेशमधील स्थलांतरितांमध्येही असुरक्षिततेची भावना वाढली आहे. लोकांमध्ये भीती एवढी आहे की, अनेक भारतीय आणि आशियाई लोक आयर्लंड सोडून इतर युरोपीय देशात स्थायिक होण्याची योजना आखत आहेत.
या वाढत्या हल्ल्यांमागे आयर्लंडमधील ढासळती आर्थिक परिस्थिती, वाढती महागाई, बेरोजगारी आणि घरांची टंचाई ही प्रमुख कारणे आहेत. काही राजकीय गट आणि सोशल मीडियावर स्थलांतरितांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेमुळे तणाव आणखी वाढला आहे. आयर्लंड सरकार आपल्या अपयशाचे खापर स्थलांतरितांवर फोडत असल्याचा आरोप होत आहे. सोशल मीडियावर भारतविरोधी सामग्रीने तणाव आणखी वाढवला आहे.
आयर्लंड इंडिया कौन्सिलचे अध्यक्ष प्रशांत शुक्ला यांच्या मते, डब्लिनमध्ये रोज हल्ल्याच्या तक्रारी येत आहेत, ज्यामुळे भारतीय आणि दक्षिण आशियाई समुदायांत भीतीचे वातावरण आहे.
आयर्लंडची लोकसंख्या ५३.८ लाख असून त्यापैकी २४ टक्के लोक स्थलांतरित आहेत. यात भारताचा क्रमांक पहिल्या पाच देशांमध्ये आहे. भारतातून सुमारे ४५,४४९ लोक तिथे वास्तव्यास आहेत. डब्लिनमध्ये ६३ टक्के स्थलांतरित राहतात, ज्यामुळे परवडणाऱ्या घरांची समस्या गंभीर झाली आहे. यामुळे स्थानिक लोकांमध्ये रोष वाढत आहे. राजकीय पक्षांनी गृहनिर्माण संकट आणि आर्थिक समस्यांसाठी स्थलांतरितांना जबाबदार धरल्यामुळे ही परिस्थिती अधिकच चिघळली आहे.
या सर्व कारणांमुळे अनेक भारतीय आणि आशियाई नागरिक आयर्लंड सोडून इतर देशांत जाण्याचा विचार करत आहेत, असे एका भारतीय परिचारिकेने लिहिलेल्या खुल्या पत्रातून समोर आले आहे.
- सुदेश दळवी