अलीकडे अमेरिकन धोरणतज्ज्ञ मायकेल रुबीन यांनी पाकिस्तानचे विद्यमान लष्करप्रमुख मुनीर यांची तुलना थेट ओसामा बिन लादेनशी केली. ही तुलना फक्त शब्दांचा खेळ नाही; तो एका धोकादायक मानसिकतेकडे बोट दाखवणारा कठोर इशारा आहे.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांनी अमेरिकेतून दिलेली अप्रत्यक्ष परमाणू हल्ल्याची धमकी ही केवळ राजकीय तणावाची खूण नव्हे, तर पाकिस्तानच्या अंतर्गत आणि बाह्य धोरणातील अस्थिरतेचे लक्षण आहे. जर आमचे अस्तित्व धोक्यात आले, तर आम्ही इतरांनाही घेऊन जाऊ. हे वाक्य ऐकायला नाट्यमय वाटेल, परंतु त्यामागील संदेश धोकादायक आहे.
सिंधू जल करार स्थगित करण्याच्या कृतीवरून नाराज असलेल्या पाकिस्तानचा भारतावर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे. भारताने अलीकडेच कराराचे पुनरावलोकन करण्याची तयारी दर्शवली आहे. हवामान बदल, वाढती लोकसंख्या आणि जलस्रोतांवरील ताण या पार्श्वभूमीवर भारत स्वतःच्या हक्काचे पाणी अधिक प्रभावीपणे वापरू इच्छितो. पाकिस्तानला मात्र हा बदल अस्तित्वाचा प्रश्न वाटतो. पाकिस्तानच्या धमकीचे तीन पैलू स्पष्टपणे जाणवतात. एक, पाकिस्तानची अंतर्गत राजकीय व आर्थिक स्थिती बिकट आहे. अशा वेळी भारतविरोधी भाषा ही त्यांच्या जनतेसमोर एकजूट निर्माण करण्यासाठी वापरली जाते. दोन, अमेरिकेतून अशा भाषणाचा उद्देश म्हणजे आंतरराष्ट्रीय समुदायाला भारताविरुद्ध सावध करण्याचा प्रयत्न आणि तिसरा हेतू म्हणजे परमाणू शस्त्रांचा उल्लेख करून ‘भयाचे शस्त्र’ वापरण्याचा प्रयत्न, ज्याला तज्ज्ञ ‘परमाणू ब्लॅकमेल’ म्हणतात. भारताला या धमकीला उत्तेजित होऊन प्रतिक्रिया देण्याऐवजी आपले जलहक्क ठामपणे आणि आंतरराष्ट्रीय नियमांच्या चौकटीत अंमलात आणावे लागतील, कारण परमाणू हत्यारे प्रत्यक्ष वापरणे हे पाकिस्तानसाठीही आत्मघातकी ठरेल. पाकिस्तानची ही भूमिका त्यांच्या जनतेच्या भविष्याशी खेळणारी आहे. जगाला हवे आहे स्थैर्य, सहकार्य आणि संवाद. परमाणु सावलीत उभे राहून शांततेचा मार्ग दिसत नाही. फक्त परस्पर संशय वाढतो. भारताने संयम राखून, पण ठामपणे आपल्या राष्ट्रीय हिताचे रक्षण करणे, हेच सुज्ञतेचे धोरण ठरेल. सध्याच्या परिपक्व नेतृत्वाला याची जाण आहे, यात संशय नाही.
पाकिस्तान हे जगाच्या नकाशावर एक राष्ट्र असले तरी, त्याच्या परराष्ट्र धोरणाची सूत्रे कायमच लष्कराच्या हाती असतात. अलीकडे अमेरिकन धोरणतज्ज्ञ मायकेल रुबीन यांनी पाकिस्तानचे विद्यमान लष्करप्रमुख यांची तुलना थेट ओसामा बिन लादेनशी केली. ही तुलना फक्त शब्दांचा खेळ नाही; तो एका धोकादायक मानसिकतेकडे बोट दाखवणारा कठोर इशारा आहे.
ओसामा बिन लादेन हा अतिरेकी घटक होता, ज्याने दहशतवादाचा वापर राजकीय व धार्मिक उद्दिष्ट साधण्यासाठी केला. त्याच्या कारवायांमुळे हजारो निरपराधांचा जीव गेला आणि त्याची उपस्थिती पाकिस्तानात असल्याचे पुरावे मिळाल्याने, त्या देशाच्या लष्करी व गुप्तचर यंत्रणांवर जगभरातून संशयाची सावली पडली होती. अमेरिकेच्या एका धडक कारवाईत त्याचा अंत झाला होता. आजचे पाक लष्करप्रमुख अधिकृत पदावर असले तरी, त्यांच्या भाषणांतून ओसामा यांची भाषा स्पष्टपणे ऐकू येते. भारताला वारंवार दिल्या जाणाऱ्या अप्रत्यक्ष अण्वस्त्र धमक्या, सीमापार दहशतवादाचे सातत्याने समर्थन आणि जागतिक दबाव असूनही कट्टरपंथी गटांना पाठीशी घालण्याची वृत्ती हे सर्व मिळून ही तुलना अधिकच सार्थ वाटू लागते. खरे तर ही परिस्थिती पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेसाठी घातक आहे. एक राष्ट्र म्हणून जबाबदारीने वागण्याऐवजी, जर त्याचे सर्वोच्च सैन्यनेते भीती आणि हिंसेला राजकीय साधन म्हणून वापरत असतील, तर जग त्यांच्या वर्तनाकडे त्यांनी प्रायोजित केलेला दहशतवाद म्हणून पाहतील आणि मग ओसामासारख्या व्यक्तीशी तुलना होणे अपरिहार्य ठरेल.
पाकिस्तानची ही उघड प्रतिमा जगासमोर मांडून, सीमापार दहशतवादाबाबत आंतरराष्ट्रीय सहानुभूती आणि समर्थन मिळवण्याची भारतीय नेत्यांना ही संधी आहे. त्यासाठी भावनिक आरोप नव्हे तर ठोस पुरावे, आकडे, आणि सुसंगत राजनैतिक मोहीम आवश्यक आहे. ओसामा बिन लादेन आणि पाक लष्करप्रमुख यांच्यातील तुलना ही केवळ व्यक्तींमधील नव्हे, तर एका विचारसरणीच्या समानतेची खूण आहे आणि जोपर्यंत ही मानसिकता पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वात जिवंत आहे, तोपर्यंत दक्षिण आशियात शांततेचे स्वप्न पाहणे केवळ भाबडेपणाच ठरेल.
हे सारे चित्र एवढे स्पष्ट असताना अमेरिका सतत पाकिस्तानची पाठराखण करीत आहे, यामागील कारणे पाहावी लागतील. पाकिस्तानने अमेरिकेच्या दृष्टीने दोन भूमिका अर्थपूर्णपणे बजावल्या आहेत, ज्या भारतासमवेत आणि अफगाणिस्तानाशी संबंधित आहेत. हे स्पष्ट आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते अफगाणिस्तानातील बाग्राम हा परिसर चीनने बळकावला आहे. जर हे खरे असेल तर अमेरिकेचा पाकिस्तानचा वापर करण्याचा हेतू या जवळीकीमागे आहे हे निश्चित. तालिबान सरकार नियंत्रणात आणण्याची किंवा बाहेर काढण्याची पाकिस्तानची इच्छा आहे.
पाकिस्तानला बलुचिस्तानातील वाढत्या बंडखोरीला नियंत्रित करण्यात आणि त्याच्या ताब्यातील क्षेत्रांतील नवीन समस्यांना सामोरे जाण्यास मदतीसाठी अमेरिकेचे सहाय्य देखील हवे आहे. पाकिस्तानकडे 'तेलाचे विशाल भंडार' असल्याचा विचार ट्रम्प बोलून दाखवत असले तरी हे वास्तववादी दिसत नाही. पाकिस्तान भारताविरुद्ध काही योजना आखत आहेत का, याचा विचार ताणतणावाच्या सध्याच्या काळातही करण्याची वेळ केंद्रातील मोदी सरकारवर आली आहे. मुनिरच्या अमेरिकेतील भेटीही बीजिंगमध्ये भुवये उंचावण्यास कारणीभूत ठरल्या आहेत. त्याच्या मागील भेटीनंतर वॉशिंग्टनमधून परतल्यावर पाकिस्तानी नेत्यांना बीजिंगला भेट देण्याची गरज भासली, हेही लक्षात घ्यावे लागेल.
गंगाराम केशव म्हांबरे
(लेखक पत्रकार असून विविध
विषयांवर लेखन करतात)
मो. ८३९०९१७०४४