सगळ्या गुणांचे लोण उतरवावेत

मुमुक्षु असलेल्या साधकाने वैभवाचा सर्व गर्व सांडून, देहभाव समूळ सांडून लीनपणे सगळ्या गुणांचे लोण उतरवावेत. म्हणजे देहभाव, ज्ञान, त्याचा गर्व व ही सगळी गुणसंपदा परब्रह्म वासुदेवाला अर्पण करावी.

Story: विचारचक्र |
10th August, 11:20 pm
सगळ्या गुणांचे लोण उतरवावेत

मागील लेखात आपण ९ व्या अध्यायातील २४ व्या श्लोकाचे विस्तृत विवेचन पाहिले. आता २५ व्या श्लोकाकडे वळूया.

यान्ति देवव्रता देवान्पितृन्यान्ति पितृव्रता:।

भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति 

मद्याजिनोsपि माम।।२५।।

सरळ अर्थ : कारण हा नियम आहे की देवतांचे पूजन करणारे देवतांप्रत पोचतात, पितरांचे पूजन करणारे पितरांप्रत पोचतात, भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात आणि माझे भक्त मलाच येऊन पोचतात. म्हणून माझ्या भक्तांचा पुनर्जन्म होत नाही.

विस्तृत विवेचन : हे अर्जुना, जे काया-वाचा-मनें इंद्रादिक देवतांचे मनापासून पूजन करतात त्यांना हा देह सोडल्यावर स्वर्गलोकांत देवत्वाची प्राप्ती होते. जे मन:पूर्वक पितरांच्या श्राद्धादिक व्रतांचे आचरण करतात, त्यांना खरोखर हा जन्म संपल्यावर पितृलोकाची प्राप्ती होते.

जे लोक भूतपिशाच्चादी क्षुद्र देवतांना मानून मंत्रयोजनेसहित जारण-मारणादी प्रयोगांचे आचरण करतात, त्यांना हा देह सोडल्यावर भूतत्वाची प्राप्ती होते. अशारीतीने ज्यांचे ज्यांचे जस-जसे संकल्प असतात, त्यांची त्यांची कर्मे तशी तशी फलद्रूप होतात. मग, असे असताना जे कानांनी मलाच ऐकतात, डोळ्यांनी मलाच पाहतात, मनाने माझेच चिंतन करतात, वाणीने माझ्याच नावाचे उच्चारण करतात, जे माझ्याच नामसंकीर्तनात रंगून जातात, जे सर्वांगीण सर्वठायी माझ्यासाठीच दान-धर्मादी पुण्यकर्में करून मलाच वंदितात; ज्यांच्या अध्ययन, अभ्यास व ज्ञानप्राप्तीचे प्रयत्न इत्यादींनी माझेच दर्शन होते, जे माझ्या स्वरूपी प्रीती ठेवून अंतर्बाह्य तृप्ती पावतात, जे सर्वही जीवन खऱ्या अर्थाने माझ्या कारणीच लावतात, 'हरि-दास्य' हेच आमचे भूषण होय असे जे स्वाभिमानाने मीपणा मिरवतात, माझाच एकट्याचा लोभ असतो या अर्थाने जे लोभी असतात, माझ्याच प्रेमाच्या कामनेने जे सकाम असतात, जे मद्रूप होऊन बाकी सर्व विसरलेले असतात, ज्यांची शास्त्रे माझेच ज्ञान करून देतात आणि ज्यांचे मंत्रही माझीच प्राप्ती करून देतात व अशारीतीने ज्यांचे व्यापार निरंतर माझ्यासाठीच होत असतात, त्यांना मरणापूर्वीच माझे स्वरूप प्राप्त झालेले असते आणि देहान्तानंतरही ते माझ्याच स्वरूपी येऊन मिळालेले असतात. म्हणून हे धनंजया, जे पूजनाच्या निमित्ताने मला जीवभाव अर्पण करतात, ते पूर्णतया माझ्या स्वरूपीच ऐक्य पावतात. अर्जुना, आत्म-समर्पणाविना माझी जाण कोणासही आकळून येत नाही. 'आपण ब्रह्मज्ञानी आहोत' असे जर कोणी म्हणत असेल तर तो अज्ञानी असतो हेच खरे! 'आपल्याला ज्ञान झाले' असा अभिमान धरणे हाच त्याचा कमीपणा असतो. यज्ञ-दान-तप यांचे आचरण करून जे कोणी माझे परमात्म-रूप पाहू जातात, त्यांच्या कर्माचा तो डौल फोल होय. त्याला काडीचेही मोल नाही.

ब्रह्मज्ञान प्राप्त करून त्या ज्ञान-शक्तीच्या बळाने जे कोणी वेदाहून सुद्धा कितीही थोर झालेले असले, तरी ही ते त्या ज्ञानाच्या गर्वाने फुगून न जाता मौन धरून राहतात.

कोणीही कितीही बोलणारा असला (म्हणजे ज्ञानी असला) तरी त्याला शेषाहून श्रेष्ठ म्हणता येईल का? असा जो श्रेष्ठांमाजी श्रेष्ठ, तो शेषही स्वतः परब्रह्म परमात्मा वासुदेवाचे अंथरूण होऊन राहतो! शुक, सनक, सनंदन यांच्यासारखे माझा छंद घेऊन राहिलेले थोर मुनीसुद्धा या ज्ञानाचा गर्व न मिरवता वेड्यापिशांसारखे (म्हणजे इतके साधे) होऊन राहतात!

तापसांचा विचार करायचा झाला तर त्यांच्यामधे थोराहून थोर शिवशंभू शंकर महादेव! पण तो ही सगळा अभिमान, गर्व सोडून पद-तीर्थ म्हणजे भगवंतांच्या पायापासून निघालेली गंगा आपल्या मस्तकावर धारण करतो!

पद्मजा! लक्ष्मी!! हे अर्जुना, मला सांग, या लक्ष्मीइतके सर्वथा संपन्न दुसरे कोणी आहे का? तिच्या घरी ऋद्धीसारख्या दासी निरंतर सेवेत असतात! खेळता खेळता एकदा त्यांनी घरकुल तयार केली आणि त्यांना नाव दिले इंद्र-पुरी! म्हणजे इंद्रादिक या सगळ्या त्यांच्या बाहुल्याच झाल्या नाही का? मग खेळता खेळता मधेच त्यांना त्या खेळाचा कंटाळा आल्याने त्यांनी तो घरकुलांचा खेळ मोडून टाकला! तेव्हा इंद्रादिक इत्यादी या सर्वांचे एका क्षणात हीन-दीन-रंक झाले की नाही?

तिच्या त्या ऋद्धीची ज्या ज्या वृक्षांवर दृष्टी फडते, ते ते सगळे कल्पवृक्ष होतात! अशा सामर्थ्यसंपन्न दासी जिच्या आसपास वावरतात, ती मुख्य मालकीण इंदिरा (म्हणजेच लक्ष्मी) सुद्धा आपल्या त्या अतुलनीय थोरवीचा सगळा अभिमान सोडून मला परब्रह्म परमात्मा वासुदेवालाच सर्वस्व अर्पण करून माझ्या पायाशी बसून सेवा करत असते! म्हणून आपला थोरपणा व पांडित्याचा अभिमान सोडून देऊन साधकाने जगात लीनाहून ही लीन व्हावे. म्हणजे त्याला माझे संन्निधान लाभते. जवळीक लाभते. सूर्याने आपले डोळे सहजपणे उघडताच जिथे चंद्रही निस्तेज होतो, तिथे काजव्याने आपला तो टिमटिमता उजेड दाखवून तरी किती मिरवावे? जिथे सर्वोच्च तापस चंद्रमौळी शिवशंभू शंकर महादेवाचेही तप आणि साक्षात् पद्मजा लक्ष्मीचेही ऐश्वर्य उणे पडते, तिथे या हेंदऱ्या गचाळ प्राकृत मानवाचा काय पाड?

म्हणून हे अर्जुना, मुमुक्षु असलेल्या साधकाने वैभवाचा सर्व गर्व सांडून, देहभाव समूळ सांडून लीनपणे सगळ्या गुणांचे लोण उतरवावेत. म्हणजे देहभाव, ज्ञान, त्याचा गर्व व ही सगळी गुणसंपदा परब्रह्म वासुदेवाला अर्पण करावी.

पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे 

भक्त्या प्रयच्छति।

तदहं भक्त्युपहृतमश्नामि 

प्रयतात्मन:।।२६।।

सरळ अर्थ -  तसेच अर्जुना, माझ्या पूजनात विशेष सुगमता अशी आहे की पत्र (म्हणजे झाडाचे पान), पुष्प म्हणजे फूल, फळ, पाणी इत्यादी जो कोणी भक्त मला प्रेमाने अर्पण करतो, त्या शुद्धबुद्धीच्या निष्काम प्रेमी भक्ताने प्रेमपूर्वक अर्पण केलेले ते पत्रपुष्पादिक मी सगुणरूपाने प्रकट होऊन मोठ्या प्रीतीने खातो.

(क्रमशः)


मिलिंद कारखानीस

(लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल 

असून ते विविध विषयांवर लेखन करतात.)

मो. ९४२३८८९७६३