महाराष्ट्रात दरवर्षी चारशे चित्रपट सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी जातात, मग गोमंतकीय निर्माते मागे का, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. राज्य सरकारचे धोरण तर चित्रपट निर्मितीसाठी पोषक असताना हे चित्र अपेक्षित नव्हते.
गोव्यात मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन, यात काही नावीन्य राहिलेले नाही. मागील सुमारे दीड दशकातील अशा प्रकारचा चौदावा महोत्सव नुकताच पणजीत संपन्न झाला. वास्कोतील संजय आणि श्रीपाद या शेट्ये बंधूंच्या खडतर मेहनतीतून आणि प्रसंगी बरीच पदरमोड करून हे आयोजन केले जाते. मराठी चित्रपटांचा हा महोत्सव नियमितपणे तब्बल चौदा वर्षे यशस्वीपणे आयोजित करणे, हे तसे पाहता सोपे काम नाही. दरवर्षी काही नवीन चित्रपटांचे प्रिमियर शो दाखवण्याबरोबरच अन्य काही गाजलेल्या चित्रपटांचाही त्यात समावेश करून मराठी रसिकांची तहान भागवण्याचे काम शेट्ये बंधूंचे विनसन वर्ल्ड करते आणि यंदाही त्यात खंड पडला नाही. त्याबद्दल शेट्ये बंधू आणि त्यांची टीम निश्चितच अभिनंदनास पात्र आहे यात वाद नाही. पण यातून सकारात्मक असे काही घडतेय का, वा घडण्याची शक्यता आहे काय, याचा विचार करता त्यावर समाधानकारक असे उत्तर मिळत नाही. मराठी चित्रपट महोत्सव तर आता पार पडलेला आहेच. पुढील दोन दिवसात राज्य स्तरावरील कोकणी आणि मराठी चित्रपट महोत्सवाचेही आयोजन होत आहे आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) आयोजन तर तीन महिन्यांवर येऊन ठेपले असल्याने त्याचेही वेध गोमंतकीय चित्रपट रसिकांना लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मराठी चित्रपट महोत्सवाच्या आयोजनाने आम्हाला काय दिले वा एखादा नाव घेण्यासारखा मराठी चित्रपट आपण अजून का देऊ शकलो नाहीत, असा विचार सर्वसामान्य मराठी रसिकांच्या मनात आलाच तर तो सहजसुलभ म्हणावा लागेल.
गोवा मराठी चित्रपट महोत्सवादरम्यान महाराष्ट्राच्या चित्रपट उद्योगातील मोठमोठ्या व्यक्तिमत्वांची उपस्थिती होती आणि त्यांच्या उपस्थितीमुळेच तर या महोत्सवाला वेगळीच प्रतिष्ठा लाभली आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही. महोत्सवाच्या यशासाठी अशा मान्यवरांची उपस्थिती आणि काही दर्जेदार चित्रपट हे गमक असते. ते साध्य करण्यासाठीच आयोजक प्राण ओततात. शेट्ये बंधूंचे यश यातच सामावलेले आहे. यावेळीही प्रथितयश अभिनेते-कलाकार, निर्माते-दिग्दर्शक यांच्या उपस्थितीचे आकर्षण कायम राहिले आणि महोत्सव रंगला. महेश मांजरेकरांच्या 'निरावधी' या चित्रपटाच्या वर्ल्ड प्रिमियरने महोत्सवाचे उद्घाटन झाले, तर अन्य काही चित्रपटांचाही प्रिमियर झाला. मराठी आणि हिंदीतही आपल्या अभिनयाची मुद्रा उमटवणारे दिग्गज अभिनेते मोहन आगाशे यांना कृतज्ञता पुरस्काराने गौरवण्याने या सोहळ्यास वेगळीच किनार लाभली. महेश मांजरेकर, रोहिणी हट्टंगडी, मृणाल कुलकर्णी, सुबोध भावे, अजिंक्य देव, गजेंद्र अहिरे, सिद्धार्थ जाधव, अनिता दाते आदि अनेक दिग्गजांना एकत्र आणणे हे तसे सोपे नाही. पण आयोजकांनी यावेळीही त्यात काही कसर पडू दिली नाही. मोहन आगाशे, महेश मांजरेकर आदिंनी आयोजकांचे कौतुक आणि अभिनंदनही केले. पण गोवा चित्रपट महोत्सवात मागील अनेक वर्षांपासून गोव्याचा असा एखादा चित्रपट नसावा, याची खंत मात्र मराठी रसिकांना लागून राहिली होती हे स्पष्ट जाणवत होते.
गोव्यात 'इफ्फी'ने आपले स्वतःचे घर बसवल्यास दोन दशकांहून अधिक काळ उलटला आहे. पण ज्याची आपल्याला अपेक्षा होती, ते काही प्रमाणात तरी साध्य झाले आहे का, याचे उत्तर आजही नकारार्थीच आहे. भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पर्यटनाच्या आघाडीवर निश्चितच मोठा लाभ या प्रदेशाला झाला आहे हे मान्य करावेच लागेल, पण 'इफ्फी'मुळे चित्रपट संस्कृती येथे मोठ्या प्रमाणात रुजेल ही जी अपेक्षा होती ती कितपत पूर्ण झाली, हा प्रश्नच आहे. इफ्फीतही मराठी, हिंदी तसेच अन्य प्रादेशिक भाषांमधील दर्जेदार चित्रपट आम्ही दरवर्षी पहातो. पण मागील काही वर्षात आपण या क्षेत्रात नेमके कुठे आहोत याचा विचार करावाच लागेल. दोन-तीन दिवसातच गोवा राज्य कोकणी-मराठी चित्रपट महोत्सव आयोजित केला असून कोकणी चित्रपटांची या महोत्सवातील वाढलेली संख्या सर्वांचेच समाधान करणारी असली तरी मराठी विभागात केवळ एकमेव सिनेमा असावा, हे मात्र मनाला पटणारे नाही. कोकणी चित्रपटांना येथे मोठ्या प्रमाणावर रसिक वर्ग आहे आणि मराठी चित्रपटांसाठी तो मिळत नाही, असे कोणी म्हणत असेल तर ते चुकीचे ठरेल. पण कोकणी चित्रपटांच्या निर्मितीसाठी मोठ्या संख्येत युवा वर्ग पुढे येऊ लागल्याचे जे चित्र यामुळे आज दिसत आहे, ते मात्र गोव्याच्या चित्रपट क्षेत्राच्या भवितव्याच्यादृष्टीने दिलासा देणारे आहे. 'चोपडी' हा एकमेव मराठी चित्रपट राज्य चित्रपट महोत्सवात असावा यातून अनेक प्रश्न कोणाच्याही मनात रेंगाळत राहिले तर त्याचे उत्तर मिळणे कठीण आहे.
गोव्यात शासकीय पातळीवर दर दोन वर्षांनी राज्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन व्हायचे. आता २०२० नंतर प्रथमच त्याचे आयोजन होत असल्याने चित्रपटांची गर्दी असेल अशी अपेक्षा होती, पण तसे काही दिसत नाही. कोकणीने आपली पताका फडकवत ठेवली हे चांगले झाले, पण मराठी चित्रपट का निर्माण होत नाहीत, यामागील कारणांचा शोध घ्यावाच लागेल. मराठी चित्रपट येथे चालत नाहीत, हे कारण ढोबळ वाटते. दर्जेदार मराठी चित्रपटांच्या प्रतिक्षेत पुरा महाराष्ट्रही आहे. आज दोनेक हजार यूट्यूब चॅनलही अशा चित्रपटांचे ग्राहक आहेत, मग अडलंय कुठे हे कळत नाही. महाराष्ट्रात दरवर्षी चारशे चित्रपट सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी जातात, मग गोमंतकीय निर्माते मागे का, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. राज्य सरकारचे धोरण तर चित्रपट निर्मितीसाठी पोषक असताना हे चित्र अपेक्षित नव्हते. महाराष्ट्रातील चित्रपट निर्मात्यांनाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यासाठी खुणावले हे बरे झाले. तीस टक्के स्थानिक कलावंत-तंत्रज्ञांचा असेल तर असे निर्मातेही अनुदानासाठी पात्र ठरवण्याचे धोरण असेल तर त्यास कोणी आक्षेप घेण्याचे कारण नाही. गोव्यात प्रतिभावंत कलाकार आहेत, हे अमान्य करण्याचा प्रश्नच नाही. अशा हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम कोणी करणार असतील, तर त्यासाठी हात सैल केल्याने काही आकाश कोसळणार नाही. गोमंतकीय कलाकारांच्या सहभागाने एखादा बिग बजेट मराठी चित्रपटच गोव्याच्या चित्रपट उद्योगाची बऱ्यापैकी बुनियाद घालू शकेल. फिल्म सिटी उभारण्याच्या बाता तर प्रतापसिंग राणे-लुइझिन फालेरो यांच्या काळापासून आम्ही करत आहोत, पण आपला निसर्गसुंदर गोवा हाच मुळी एक फिल्म सिटीच असल्याने त्याबाबतीत आम्ही खूप नशीबवान आहोत. जिद्दीनेच या क्षेत्रात पुढे जाण्याची गरज आहे, तेव्हाच कुठे काही हाताला लागण्याची आशा बाळगता येईल.
- वामन प्रभू
(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून, राजकीय तसेच क्रीडा विश्लेषक आहेत) मो. ९८२३१९६३५९