देशाच्या इतर भागांतही महामार्ग, लोहमार्ग, धरण आणि पाटबंधारे प्रकल्प त्याचप्रमाणे विकासाचे नाव धारण करून येणारे प्रकल्प यामुळे हत्तींचे जगणे संघर्षपूर्ण झालेले आहे.
अजस्त्र देहाच्या महाकाय सस्तन प्राण्यांमध्ये हत्तीचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. भारतीय भूमीत हत्तींचे वास्तव्य शेकडो वर्षांपासून आहे आणि त्याच्या सान्निध्यात रहाणाऱ्या इथल्या लोकमानसाला गजमुखी देवतेची प्रेरणा झाली नसेल, तर नवल मानावे लागेल. मोठ्या खांबांसारखे त्याचे चार पाय आणि त्याच्या देहाला शोभेल अशी महाकाय आणि तितकीच संवेदनाशील असलेली त्याची सोंड, यामुळे या प्राण्याचे आकर्षण भारतीय लोकमानसाला पूर्वापार झालेले आहे. भय, आश्चर्य, चमत्कृती यामुळे आदिमानवाला धर्माची संकल्पना निर्माण झाली असे मानले जाते आणि हत्तीची ताकद, त्याची सोंड आणि बुद्धी चातुर्य यामुळे भारतीय उपखंडातील लोकमानसाला त्याच्यात दिव्यत्वाची प्रचिती आली.
गजानना श्रीगणराया। आदी वंदु तुज मोरया॥ अशी प्रार्थना म्हणणाऱ्या भाविकाला हा देव विशेष भावला आणि त्यामुळे त्याची उपासना भारतभर नाना स्वरूपात प्रचलित आहे. १२ ऑगस्ट २०१२ याच दिवशी पहिला हत्ती दिन साजरा करण्यात आला, त्याला जगभर हत्तींची निघृणपणे हस्तीदंतासाठी होणारी शिकार, आशिया आणि आफ्रिकेतील देशांत विकासाच्या प्रकल्पांसाठी केली जाणारी जंगलांची वारेमाप तोड, अन्न तसेच पिण्याच्या पाण्यासाठी चालू असलेला हत्तींचा जीवघेणा संघर्ष यामुळे जागृती व्हावी आणि त्यादृष्टीने त्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी प्रयत्न सुरू व्हावेत, म्हणून हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला.
एकेकाळी आशिया आणि आफ्रिकेतील घनदाट अरण्यांत हत्तींचे वास्तव्य होते आणि त्यांच्याबरोबर तत्कालीन मानवी समूहाचे सौहार्दाचे स्नेहबंध होते. परंतु चीनसारख्या देशात आणि अन्य प्रातांत हस्तीदंतांची मागणी हस्तकलेच्या दृष्टीने वाढत गेल्याने नर आणि सुळेवाल्या हत्तींच्या शिकारीचे प्रस्थ निर्माण होत गेले आणि त्यामुळे त्यांची शिकार मोठ्या प्रमाणात करणाऱ्या टोळ्या ठिकठिकाणी सक्रिय झाल्या. दक्षिण भारतातील कारागीर हस्तीदंताच्या कोरीव कामासाठी आणि कलाकृतींसाठी ख्यात असल्याने, त्यांना सुळे पुरवण्यासाठी नर हत्तींची वारेमाप शिकार होऊ लागली.
भारत सरकारने १९७२ साली वन्यजीव कायदा मंजूर करून हत्तीच्या संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी नियोजनबद्ध मोहीम प्रभावीपणे राबवली. परंतु असे असताना हस्तीदंतांसाठी केल्या जाणाऱ्या शिकारीवर नियंत्रण प्रस्थापित झाले तरी त्यांचा नैसर्गिक अधिवास मोठ्या प्रमाणात नष्ट होऊ लागल्याने हत्तींचे कळप अन्न आणि पाण्याच्या प्राप्तीसाठी शेती बागायती पिकासाठी आणि पेयजलासाठी लोकवस्तीकडे वळत असल्याने हत्ती आणि तेथील मानव यांच्यातला संघर्ष ठिकठिकाणी विकोपाला गेलेला आहे.
२००१ सालापासून कर्नाटकातील हत्तींनी आपला मोर्चा तिळारी खोऱ्याकडे वळवला आणि आजतागायत त्यांनी आपले बस्तान तिळारीबरोबर माणगाव खोऱ्याकडेही वळवल्याने गेल्या पाव शतकापासून महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने डोळसपणे उपाययोजना न आखल्याने हत्ती आणि मानव यांच्यातला संघर्ष विकोपाला पोहचलेला आहे. प्रारंभी महाराष्ट्र सरकारने हत्तींची पुनर्पाठवणी करण्यासाठी बेशिस्तीने मोहीम राबवली आणि त्यामुळे हत्ती कर्नाटकात पुन्हा जाण्याएवजी सध्या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि बागायतदार यांच्या हातीतोंडी आलेला घास हिरावून घेत आहेत आणि त्यामुळे हत्तींची कायमची इथून हकालपट्टी करावी, अशी आग्रही मागणी संबंधित मंडळी वारंवार करू लागलेली आहे. कोल्हापूर येथील चंदगड जवळच्या जेलगुंडीच्या संत्रस्त मंडळींनी हत्तींना रोखण्यासाठी विद्युतभारित कुंपणाचा आधार घेतला आणि त्यात तीन हत्तींना मृत्यू आला. हत्ती आणि मानव यांच्यातील संघर्षामुळे सुमारे दोन डझनभर हत्ती आणि तितक्याच प्रमाणात माणसांचाही बळी गेलेला आहे. कर्नाटकातील कागद कारखाना हत्तींचा नैसर्गिक अधिवास असलेल्या जंगलात सुरू करण्यात आला. त्याचबरोबर काळी गंगेवर जलविद्युत निर्मिती, पेयजल आणि जलसिंचन सुविधा पुरवण्यासाठी ठिकठिकाणी धरण प्रकल्प उभारले गेले. त्यामुळे अन्न आणि पाण्यासाठी हत्ती तिळारी खोऱ्याकडे वळले. गोव्यातील डिचोली, पेडणे, बार्देश तालुक्यातील दोडामार्ग तालुक्याशी संलग्न असलेल्या गावांतही हत्तींनी आगमन केल्यावर तेथील लोक बिथरले आणि त्यातून निर्माण झालेल्या संघर्षात रेवोडा आणि इब्रामपूर येथील दोघाजणांचा मृत्यू झाला. सध्या गोव्यातला हत्तींचा उपद्रव कमी झालेला असला तरी दोडामार्ग आणि चंदगड तालुक्यात त्यांचा संघर्ष चालू आहे.
महाराष्ट्राच्या वनमंत्र्यांनी स्थानिक शेतकरी आणि बागायतदार यांच्याशी बैठक घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबरोबर नुकसान भरपाई वाढवण्याबरोबर सदर प्रक्रिया सुटसुटीत करण्याचे आश्वासन दिलेले आहे. चित्रपट अभिनेता जॉन अब्राहम याने तिळारी खोऱ्याला हत्तींच्या वास्तव्याला पोषक परिस्थिती निर्माण करून हत्ती ग्राम स्थापन करण्यासाठी वावरण्याचे जाहीर केले होते, परंतु हत्तीग्रामाची योजना काही पूर्णत्वास येऊ शकली नाही. या उलट जेथे हत्तींचे वास्तव्य आहे, तेथे रबर लागवड करणारी मंडळी आणि पर्यावरणीय नियमांची पायमल्ली करत अनिर्बंधपणे दगडाच्या खाणी सुरू केल्याने आणि शेती - बागायती क्षेत्रातून त्यांची होणारी हकालपट्टी यामुळे हत्तींसाठी तिळारी खोरे प्रतिकुल केले जात आहे. मनुष्यविरहीत गावांत रबराची होणारी लागवड आणि शेती - बागायतदारांकडून हत्तींना केला जाणारा उपद्रव यामुळे हत्ती आणि मानव यांच्यातला संघर्ष सुरू आहे. देशाच्या इतर भागांतही महामार्ग, लोहमार्ग, धरण आणि पाटबंधारे प्रकल्प त्याचप्रमाणे विकासाचे नाव धारण करून येणारे प्रकल्प यामुळे हत्तींचे जगणे संघर्षपूर्ण झालेले आहे.
वन्यजीव आणि पर्यावरणीय संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी वावरणाऱ्या तज्ज्ञ आणि अनुभवी मंडळींच्या मदतीने तिळारीत हत्तीग्राम विकसित करण्याबरोबर परिसरातील स्थानिकांना विश्वासात घेऊन योग्य उपाययोजना आणि नुकसान भरपाई देण्याबरोबर पर्यावरणस्नेही स्थानिकांच्या उपजीविकेचे मार्ग सशक्त करण्याची नितांत गरज आहे.
- प्रा. राजेंद्र केरकर
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५