गुंडगिरीला हद्दपार करा

विशेष म्हणजे हे गुंड आता पिस्तूल बाळगू लागले आहेत. यावरून गोव्यात अशी शस्त्रेही उपलब्ध आहेत, हेही समोर आले आहे. पोलिसांनी अशा गुंडांना आपला खाकीचा दम दाखवला नाही, तर हे गुंड अधिक बेफिकीर होतील. अशा गुंडांचा कायमचा बंदोबस्त कसा होईल, त्याकडे पोलिसांनी लक्ष द्यायला हवे.

Story: संपादकीय |
13th August, 03:04 am
गुंडगिरीला हद्दपार करा

गोव्यातील गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलीस खाते आघाडीवर आहे. परंतु, त्याच गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी ते न्यायव्यवस्थेसमोर पुरावे सादर करण्यात अपयशी ठरत आहेत. एकच गुन्हेगार पुन्हा पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात सापडतो आणि सुटतोही. त्यामुळेच चोऱ्या थांबत नाहीत. घरफोड्या सुरूच आहेत. ड्रग्जसारख्या व्यवहारातील आरोपीही मोकळे सुटतात. अभ्यास आणि पुराव्यांच्या अभावामुळे प्रकरणे योग्य पद्धतीने मांडली जात नसावीत किंवा प्रक्रिया योग्य पद्धतीने केली जात नसावी. त्यामुळे आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण अगदी कमी झाले आहे. गुन्ह्यांचा छडा लावण्याचे प्रमाण गोव्यात चांगले आहे, पण त्याच गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण अगदी कमी. त्यामुळेच गुन्हेगारांना भीती राहिली नाही की काय, असे म्हणण्याची वेळ आली आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात इथे राहणाऱ्या परप्रांतीयांचाही मोठा भरणा आहे. त्यामुळेच गोव्यातील गुन्ह्यांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त गुन्हेगार हे परप्रांतीय आहेत. इतर राज्यांतून इथे येऊन राहत असलेले अनेकजण गोव्यातील गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेले आढळतात. हे प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे. चोऱ्या, दरोडे, ड्रग्ज, बलात्कार, खून अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये परप्रांतीयांचा मोठा सहभाग आहे, हे यापूर्वीही आकड्यांवरून सिद्ध झाले आहे. मात्र त्यातील अनेकजण गोव्यात अनेक वर्षांपासून राहतात त्यामुळे त्यांना आता परप्रांतीय म्हणावे का, असा प्रश्न उपस्थित होईल. कारण सरकारच सर्वांना गोवेकर होण्यासाठी पायघड्या घालत आहे, त्यामुळे खऱ्या गोवेकरासोबत आता परप्रांतीयही इथले मूळनिवासी होतील यात शंका नाही. तशा प्रकारची तरतूद सरकारने कोमुनिदाद आणि सरकारी जागेतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या विधेयकांमधून केली आहे. त्यातच गोव्यात अनेकदा टोळीयुद्धे भडकतात. स्थानिक सराईत गुंड ज्यांची नावे पोलिसांच्या यादीत आहेत, ते अधून मधून समाजात अशांतता माजवण्याचा प्रयत्न करतात. काही गुंडांनी तर बाऊन्सर पुरवठा करणाऱ्या कंपन्याच काढल्या आहेत. असे असले तरी, गोव्यातील गुन्हेगारी अजूनही पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. हल्लीच दोनापावला परिसरात एका उद्योजकाच्या घरावर दरोडा पडला होता. आजपर्यंत पोलिसांना त्या चोरांचा पत्ता लागलेला नाही. सोनसाखळ्या, मंगळसूत्र चोरणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. गुन्हेगारांमध्ये पोलिसांची भीती कमी झाली आहे, पकडल्यानंतर जामीन मिळतोच अशी खात्री झाल्यामुळे कदाचित गुन्हेगार शेफारले असावेत.

फातोर्डा पोलीस स्थानकाच्या हद्दीत कोलवा - मडगाव रस्त्यावर मंगळवारी पहाटे जो थरार घडला, त्यावरून पोलिसांची भीती गुंडांमध्ये राहिलेली नाही, असेच वाटते. दोन तरुणांना अडवून त्यांच्यावर कोयता, दंडुक्यांनी हल्ला होतो. ते बचाव करू पाहतात म्हणून शेवटी गोळीबार होतो. असे प्रकार गोव्यात क्वचितच होतात. गोळीबार करण्यापर्यंत गुंडांची मजल गेली यावरून हा गंभीर चिंतेचा विषय झाला आहे, हे आधी प्रशासनाने मान्य करायला हवे. गोव्यातील काही गुंडांचा त्यांच्यातील मतभेदांमुळे गेल्या काही वर्षांत सोक्षमोक्ष लागलेला आहे. अश्पाक बेंग्रेचा तुरुंगात खून झाला. त्यानंतर त्याला मारणाऱ्या विनायक कार्बोटकरचा तुरुंगातील हाणामारीत मृत्यू झाला. दुसरा एक सराईत गुंड अन्वर शेख याचा कर्नाटकात कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात आला. पोलिसांच्या यादीत असलेल्या तिसवाडीतील पावलू डिक्रुझवर त्याच्या घरी हल्ला झाला होता. तिसवाडीताल दुसरा गुन्हेगार सूर्या कांबळीवर मास्कधारक हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला होता. इम्रान बेपारीच्या घरावर दुसऱ्या गँगने हल्ला केल्यानंतर त्या हल्ल्यात सोनू यादव नावाचा बेपारी गँगचाच एक गुंड ठार झाला होता. गोव्यात गुंडांमधील मतभेद पुन्हा पुन्हा उफाळून येत असतात, तेव्हाच हे गुंड सक्रिय आहेत हे अधोरेखित होते. पोलिसांनी अनेकांना तडीपार करण्याची शिफारस केली आहे. काहींना तडीपारही केले आहे, पण असे असतानाही गुंडगिरी नियंत्रणात येत नाही. नवे गुंड तयार होतात आणि आपली दहशत माजवण्यासाठी एकमेकांवर हल्ले करतात. फातोर्डासारख्या भागात पहाटेच्या वेळी दोघा तरुणांना जिवंत मारण्याचा प्रयत्न होतो. आधी तलवारी, कोयत्याने हल्ला आणि नंतर पिस्तुलाने गोळ्या झाडल्या जातात यावरून या गुंडांना पोलिसांची भीती राहिलेली नाही हे स्पष्ट दिसते. विशेष म्हणजे हे गुंड आता पिस्तूल बाळगू लागले आहेत. यावरून गोव्यात अशी शस्त्रेही उपलब्ध आहेत, हेही समोर आले आहे. पोलिसांनी अशा गुंडांना आपला खाकीचा दम दाखवला नाही, तर हे गुंड अधिक बेफिकीर होतील. अशा गुंडांचा कायमचा बंदोबस्त कसा होईल, त्याकडे पोलिसांनी लक्ष द्यायला हवे.