मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या नेतृत्वाखालील हिमाचल प्रदेश मंत्रिमंडळाने जवळपास ३० वर्षांनंतर राज्यातील लॉटरी प्रणाली पुन्हा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. १९९६ मध्ये ही योजना थांबवण्यात आली होती आणि १९९९ मध्ये कायमस्वरूपी बंद करण्यात आली होती. आता ती डिजिटल स्वरूपात परत येणार असून पंजाब आणि केरळसारख्या राज्यांच्या यशस्वी व कायदेशीर चौकटीचा अवलंब केला जाणार आहे.
केरळने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये लॉटरी विभागातून १३,५०० कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळवला, तर पंजाबने २३५ कोटी रुपये, आणि सिक्कीमने सुमारे ३० कोटी रुपये मिळवले. पंजाबच्या मॉडेलमध्ये साप्ताहिक, मासिक ड्रॉ आणि सणासुदीला ‘बंपर’ लॉटरीचा समावेश असतो. या सर्वावर सरकारची थेट देखरेख असते आणि लॉटरी (नियमन) अधिनियम, १९९८ अंतर्गत ती चालवली जाते.
हिमाचलमध्ये या निर्णयावर राजकीय प्रतिक्रिया मिश्र स्वरूपाच्या आहेत. विरोधी भाजपने सामाजिक हानीची भीती व्यक्त करत निर्णयाचा विरोध केला.
माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार धुमल यांनी सांगितले की, त्यांच्या कार्यकाळात शोषणकारी पद्धती थांबवण्यासाठी ही योजना रद्द करण्यात आली होती.
उद्योग मंत्री हर्षवर्धन चौहान यांनी सांगितले की, राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हा निर्णय घेतला असून, दरवर्षी ५० ते १०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. तथापि, अधिकृत प्रारंभ तारीख किंवा कार्यपद्धती सरकारने अद्याप जाहीर केलेली नाही. प्रशासनाचा दावा आहे की गैरवापर टाळण्यासाठी आणि पारदर्शकता राखण्यासाठी प्रणालीला कठोर नियमन केले जाईल.
दरम्यान, स्थानिक पातळीवर मोठा विरोध दिसून आला आहे. अनेक ज्येष्ठ, तरुण आणि महिला या निर्णयाविरोधात बोलत आहेत. त्यांच्या मते, सरकारने शिक्षण, रोजगार यांसारख्या गरजेच्या विषयांवर लक्ष केंद्रित करायला हवे, लॉटरीसारख्या गोष्टींवर नव्हे. स्थानिक नागरिकांनी लॉटरी पुन्हा सुरू करणे हा चुकीचा निर्णय असून, यामुळे युवक मेहनतीऐवजी नशिबाच्या भरवशावर राहतील आणि व्यसनाधीन होण्याची शक्यता वाढेल, असे म्हटले आहे. अशा परिस्थितीत अनेकांचे आर्थिक आणि सामाजिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे त्यांनी सरकारला हा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले.
सध्या केरळ, सिक्कीम, महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये लॉटरी कायदेशीररित्या सुरू असून, हिमाचल सरकारच्या या निर्णयामुळे राज्याच्या महसुलात भर पडेल का किंवा समाजावर त्याचे विपरित परिणाम होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.