एकीकडे राजकीय कारणासाठी एका यशस्वी लष्करी कारवाईस गालबोट लावताना कोणताही विवेक दाखवला जात नाही असे दिसत असताना, लष्करी उच्चपदस्थ व्यक्तींनी दिलेली अधिकृत माहिती या सर्व चर्चांना पूर्णविराम देणारी ठरणार आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ या धडाकेबाज लष्करी कारवाईच्या यशाबद्दल भारत सरकारतर्फे विजयोत्सव साजरा केला जात असतानाच, दुसरीकडे या मोहिमेत कितपत यश आले, याबद्दल शंका व्यक्त करीत काँग्रेससह विरोधी पक्ष संसदेत आणि संसदेबाहेर गदारोळ माजवत असल्याचे चित्र देशवासीयांनी पाहिले. आपल्या देशाने किती विमाने पाडली, किती दहशतवादी तळ पाकिस्तानात जाऊन उध्वस्त केले यापेक्षा किती भारतीय विमाने पाडली गेली आणि किती जवान शहीद झाले, यावर भर देणाऱ्या विरोधी पक्षांनी जनतेत संभ्रम निर्माण केला. प्रणिती शिंदे या महाराष्ट्रातील खासदाराने तर ‘ऑपरेशन सिंदूर’ची तमाशा या लाजीरवाण्या आणि आक्षेपार्ह शब्दात खिल्ली उडवली. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्र मंत्री जयशंकर आपल्या लष्कराने बजावलेल्या शौर्याची स्तुती करीत होते. कदाचित ते आपल्या सरकारची बाजू सावरीत असावेत, असे चित्र निर्माण झाले. मूळ मुद्दा होता तो ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचा. त्याबद्दलच उलटसुलट मते व्यक्त करीत जनतेमध्ये आपल्या सरकारच्या कार्यक्षमतेबद्दल, निर्धाराबाबत संशय व्यक्त करण्याचे प्रयत्न जोरात सुरू असतानाच, ज्यांचा या साऱ्या राजकारणाशी संबंध नाही, ज्यांनी ही अतुलनीय मोहीम हाताळली, त्या लष्करी दलाच्या प्रमुखांनी शनिवारी केलेले निवेदन देशासमोर सत्य आणायला पुरेसे ठरले आहे. सैन्य दल आणि हवाई दलाचा या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग असल्याने संबंधित दलांचे प्रमुख या नात्याने त्यांनी केलेली निवेदने विश्वासार्ह मानावी लागतील. एकीकडे राजकीय कारणासाठी, मोदी सरकारच्या विरोधासाठी एका यशस्वी लष्करी कारवाईस गालबोट लावताना कोणताही विवेक दाखवला जात नाही, असे दिसत असताना, संसदेतील चर्चेत त्याचे प्रतिबिंब पडत असताना या जबाबदार उच्चपदस्थ व्यक्तींनी दिलेली माहिती या सर्व चर्चांना पूर्णविराम देणारी ठरणार आहे, यात शंका नाही.
हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी, ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानची पाच लढाऊ जेट्स आणि एक महत्त्वाचे टेहळणी विमान उध्वस्त करण्यात आल्याची माहिती अधिकृतपणे उघड केली आहे. यामध्ये एस-४०० हवाई संरक्षण प्रणालीने निर्णायक भूमिका बजावली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामधील एक विमान ३०० किलोमीटर अंतरावरून या प्रणालीच्या माध्यमातून पाडण्यात आले. याची आता भारतासाठी या क्षेत्रातील सर्वाधिक दूर अंतरातून केलेली हवाई कारवाई म्हणून नोंद झाली आहे. हवाई दल प्रमुखांनी केंद्र सरकारच्या राजकीय इच्छाशक्तीबद्दल विशेष आभार मानले, कारण भारतीय सशस्त्र दलांना कोणत्याही निर्बंधांशिवाय कारवाई करता आली, असे सिंग यांनी म्हटले. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ऑपरेशनची रणनीती बुद्धिबळ खेळण्यासारखी होती, असे वर्णन केले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी (२३ एप्रिल) उच्चस्तरीय बैठक झाली होती, ज्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ठोस भूमिका घेतली. आता खूप झाले अशा शब्दांत त्यांनी राग व्यक्त केला आणि लष्कर प्रमुखांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली आहे. जनरल द्विवेदी यांनी ही लढाई पारंपरिक युद्धापेक्षा ‘ग्रे झोन’मध्ये पार पाडली गेली म्हणजे बुद्धिबळासारखी रणनीती आखली गेली, ज्यात शत्रूची प्रतिक्रिया आणि भारतीय पावले कशा प्रकारे निर्धारित करायची हे अनिश्चित होते, असे सांगितले.
हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यातील एस-४०० प्रणालीचा उल्लेख आणि त्याचा प्रभाव दाखवते की, आधुनिक प्रणालीवर आधारित सक्षम संरक्षण भारतास राष्ट्रीय आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत आहे. योजनाबद्ध, वेळेत प्रकल्पांची पूर्तता न होणे आताच्या क्षमता प्रक्रियेत गंभीर त्रुटी असल्याचे जनरल द्विवेदींचे निवेदन बरेच काही सूचित करते. राजकीय नेतृत्वाने हे मुद्दे स्पष्टपणे मांडणे सुरक्षा-केंद्रित धोरणाची गुणवत्ता सुधारण्याकरता महत्त्वाचे आहे. लष्कर प्रमुखांनी ‘ग्रे झोन’चा उल्लेख करून पारंपरिक युद्धनीतीपेक्षा सूक्ष्म आणि लवचिक धोरणांचा अवलंब करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे, जे आधुनिक पद्धतीच्या संघर्षासाठी अत्यंत आवश्यक आहे. दोन्ही उच्चपदस्थांचे वक्तव्य हे केवळ ताकदीचे प्रदर्शन नसून, परिणामकारकता, धोरणात्मक सूक्ष्मता आणि प्रशासनात सुधारणा यांचा संगम आहे. एवढे यश मिळाले होते, तर मोहीम का थांबवली या काँग्रेस नेत्यांच्या प्रश्नाला द्विवेदी यांच्या भाषणात उत्तर मिळाले आहे. हे युद्ध कितीही दिवस लढता आले असते, तेवढी क्षमता होती पण लक्ष्य साध्य झाल्यावर मोहीम थांबली, असे द्विवेदी यांनी म्हटले आहे, ज्याची नोंद विरोधकांनी घ्यायला हवी.