जुने मराठी, कोकणी चित्रपट ईएसजी सुरक्षित ठेवणार : मुख्यमंत्री

निर्मित्यांना १० ते ५० लाखांपर्यंत मिळणार मदत : वर्षा उसगावकर यांना ‘जीवन गौरव’ प्रदान


11 hours ago
जुने मराठी, कोकणी चित्रपट ईएसजी सुरक्षित ठेवणार : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना अभिनेत्री वर्षा उसगावकर. सोबत दामू नाईक आणि आमदार डिलायला लोबो.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यातील जुन्या मराठी, कोकणी चित्रपट गोवा मनोरंजन संस्थेकडून सुरक्षित ठेवले जातील. यासाठी चित्रपट निर्मात्यांना एकही पैसा खर्च करावा लागणार नाही. चित्रपट तयार करण्यासाठी १० लाख ते ५० लाखांपर्यंत अनुदान दिले जाईल. चित्रपटांसाठी आर्थिक मदत देणारी योजना पुन्हा सुरू केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. गोवा चित्रपट महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्यात सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रविवारी झालेल्या गोवा चित्रपट महोत्सवाच्या समारोप सोहळ्याला व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अभिनेत्री वर्षा उसगावकर, मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्ष डिलायला लोबो, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, माहिती खात्याचे संचालक दीपक बांदेकर, दिग्दर्शक गजेंद्र अहिरे आदी उपस्थित होते. चित्रपटाचे कथानक, गायक, सिनेमॅटोग्राफर, अभिनेते यांनी पुरस्कार देण्यात आले. आमदार डिलायला लोबो यांनी स्वागत केले.
गोमंतकीयांचे नाटक, तियात्र, चित्रपटावर विशेष प्रेम असते. कोकणी रसिक गोव्यासह केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रात आहेत. कोकणी रसिकांची संख्या २ कोटींच्या घरात आहे. त्यामुळे कोकणी चित्रपटांनाही वाव आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
या महोत्सवात १९ चित्रपटांचे प्रदर्शन झाले. चित्रपटांविषयी मास्टर क्लास तसेच कार्यशाळा झाल्या. मोबाईलवर चित्रपट तयार करण्याविषयीही कार्यशाळा झाली. बाबा नाईक हे गोव्यातील पहिले चित्रपट निर्माते. चित्रपट तयार करण्यासाठी त्यांनी अनेक गोमंतकीयांना मदत केली. गोव्यात आता चित्रपट तयार होऊ लागले आहेत. चित्रीकरणाच्या परवान्यासाठी १ सप्टेंबरपासून ‘एक खिडकी’ योजना सुरू केली जाईल. पंचायत वा नगरपालिकेकडे परवाने मागायची आवश्यकता राहणार नाही. गोव्यात खूप वर्षांपासून चित्रपट तयार होत आहेत. जुने चित्रपट सध्या पहायला मिळत नाहीत. जुने आणि नवे चित्रपट सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी मनोरंजन संस्थेची असेल. चित्रपटांना आर्थिक साहाय्य देण्याची बंद पडलेली योजना पुन्हा सुरू केली जाईल. ‘अ’ दर्जाच्या चित्रपटांना ५० लाख, ‘ब’ दर्जाच्या चित्रपटांना ३० लाख, तर ‘क’ दर्जाच्या चित्रपटांना १० लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
चित्रपटांना ५० लाखांपर्यंत अनुदान द्या : वर्षा उसगावकर
कोकणी ही गोमंतकीयांची मातृभाषा. कोकणी भाषेवर प्रेम करण्यासह कोकणी चित्रपटही तिकीट काढून पाहिले पाहिजेत. तियात्र हाऊसफुल्ल होते. कोकणी चित्रपटांना गोमंतकीयांचा आश्रय मिळणे आवश्यक आहे. एक चित्रपट पूर्ण करण्यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च येतो. सरकारने चित्रपटासाठी ५० लाखांपर्यंत अनुदान देणे गरजेचे आहे. देवाचा आशीर्वाद आणि कुटुंबियांची साथ यामुळे मी अभिनय क्षेत्रात यशस्वी होऊ शकले, असे उद्गार सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी काढले.