पाच जणांचा मृत्यू : अतीमद्यपानामुळे उद्भवलेल्या आजारांमुळे दाखल ४ रुग्णांचा मृत्यू
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गतवर्षी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) औषधांचे अतिरिक्त सेवन केल्याने वैद्यकीय समस्या निर्माण झालेले ७२ रुग्ण दाखल झाले होते. यातील ६७ रुग्णांवर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले. तर अन्य ५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. याशिवाय ड्रग्स ओव्हरडोस झालेल्या २ रुग्णांवर उपचार करून त्यांना सोडून दिल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दाखल झालेल्या ७२ रुग्णांपैकी ११ ते २० वर्षे वयोगटातील ८, २१ ते ३० वर्षे वयोगटातील १६, ३१ ते ४० वर्षे वयोगटातील १८, ४१ ते ५० वर्षे वयोगटातील ९, ५१ ते ६० आणि ६१ ते ७० वर्षे वयोगटातील प्रत्येकी ७, तर ७० वर्षांवरील २ रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्यांपैकी ३१ ते ४० वर्षे वयोगटातील २, ६१ ते ७० वर्षे वयोगटातील २, तर ७० वर्षांवरील २ रुग्णांचा समावेश होता. ड्रग्स ओव्हरडोस झालेला एक रुग्ण २१ ते ३० वर्षे तर दुसरा ३१ ते ४० वर्षे वयोगटातील होता.
याशिवाय २०२४ मध्ये गोमेकॉत अतीमद्यपान केल्याने उद्भवलेल्या वैद्यकीय आजारांसाठी १७ रुग्णांना भरती करण्यात आले होते. यातील सर्वाधिक रुग्ण हे ३१ ते ४० वर्षे वयोगटातील होते. २१ ते ३० वर्षे वयोगटातील, ४ तर ४१ ते ५० वर्षे वयोगटातील २ जणांचा समावेश होता. एकूण दाखल केलेल्यांपैकी १३ रुग्णांना उपचार करून सोडून देण्यात आले. ४ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेले रुग्ण हे वय वर्षे ३१ ते ७० दरम्यानचे होते.
पुरुष रुग्णांची संख्या अधिक
प्राप्त माहितीनुसार, औषधांचे अतिरिक्त सेवन केल्याने वैद्यकीय समस्या निर्माण झालेल्या ७२ रुग्णांपैकी ३७ महिला, तर ३५ पुरुष होते. अती मद्यपानामुळे दाखल झालेल्या रुग्णांमध्ये १२ पुरुष, तर ५ महिला होत्या. ड्रग्सचा ओव्हरडोस झालेले दोन्ही रुग्ण पुरुष होते.