मुंगूल हल्ला हा टोळीयुद्धाचाच प्रकार

पोलीस अधीक्षक वर्मांचा दावा : आतापर्यंत १८ जणांना अटक


16th August, 11:27 pm
मुंगूल हल्ला हा टोळीयुद्धाचाच प्रकार

संशयितांना न्यायालयात नेताना पोलीस. (संतोष मिरजकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : मुंगूल येथील हल्ल्याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी आतापर्यंत प्रत्यक्ष सहभाग असलेल्या १६ जणांसह सहकार्य करणार्‍या दोघा संशयितांना अटक केली आहे. या प्रकरणी सहा गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. सर्व संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोन टोळीमधील याआधी झालेल्या मारामारीतून हा हल्ला करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांनी दिली.
मडगाव येथे पत्रकार परिषद घेऊन अधीक्षक वर्मा यांनी मुंगूल येथील झालेला हल्ला हा दोन टाेळींमधील याआधीच्या झालेल्या मारहाणीतून घडलेला प्रकार असल्याचे स्पष्ट केले. याप्रकरणी आणखीही काही अटक होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. मुंगूल माडेल येथील शगुन हॉटेलनजीक मंगळवारी पहाटे २.४५ च्या सुमारास गाडी अडवून तलवार, कोयता, सोडा बॉटल्सचा वापर करून संशयितांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात रफीक ताशान (२४) आणि युवकेश सिंग बदैला (२०) गंभीर जखमी झाले होते. हल्ल्यावेळी रफीक व युवकेश असलेल्या कारवर गोळीबारही करण्यात आला. यातील पाच संशयितांविरोधात पोलिसांनी ‘लुकआऊट’ नोटीस काढली होती. त्यातील राहुल तलवार अद्यापही पसार आहे. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक वर्मा यांच्या नेतृत्वाखाली पाच पथके तयार करून तपास करण्यात आला.
आतापर्यंत फातोर्डा पोलिसांनी एकूण १८ संशयितांना गजाआड केले आहे. संशयित विल्सन कार्व्हालो, शाहरुख शेख (रा. दवर्ली), रसूल शेख (रा. मडगाव), मोहम्मद अली (२४), वासू कुमार (२४), सूरज माझी (१९), मलिक शेख (१८), गौरांग कोरगावकर (२४) त्यानंतर सुनील बिलावर (२०, रा. घोगळ, मडगाव), जॉयस्टन फर्नांडिस (२०, नेरुल) यांना अटक केली होती. आता इम्रान बेपारी (३८, रा. सांताक्रूझ), अक्षय तलवार (२२, रा. ताळसाझर), अविनाश गुंजीकर (३१, रा. नावेली), परशुराम राठोड (३२, रा. बेळगाव), दीपक कट्टीमणी (४७, रा. आके बायश), अमर कुलाल, ताहीर, सलीम यांना अटक केली आहे. यातील दीपक कट्टीमणी व सलीम यांचा प्रत्यक्ष हल्ल्यात सहभाग नसला तरीही त्यांनी आर्थिक मदत व संशयितांना वास्तव्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासह इतर सहकार्य केले होते. दीपक कट्टीमणी सरकारी कर्मचारी आहे. एका सराईत गुन्हेगाराचाही या प्रकरणात सहभाग आहे, असे अधीक्षकांनी स्पष्ट केले.
हल्ल्यातील बंदुकीचा तपास सुरू
संशयितांनी जमाव करून केलेल्या हल्ल्यानंतर गोळीबारही केला होता. हल्ल्यात वापरलेल्या हत्यारांपैकी कोयता व इतर हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत. मात्र, हल्ल्यात वापरलेली बंदूक अद्याप पोलिसांना सापडलेली नाही.
पाठलाग करत हल्ला, सहा गाड्या जप्त
कोलवा येथील मार्गारिटा क्लबपासून संशयितांकडून युवकेश व रफीक यांच्या गाडीचा पाठलाग करण्यात आला होता. मुंगूल येथे गाडीला गाठून त्यानंतर हल्ला झाला. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत थार, बोलेनो, फ्रोन्क्स, डस्टर, सुझुकी एक्स १, इनोव्हा अशा सहा गाड्या जप्त केल्या आहेत.
आणखी तिघांना अटक शक्य
टोळीयुद्धाच्या या प्रकरणात काही संशयित पसार आहेत. लुकआउट नोटीस बजावलेल्या राहुल तलवारचा शोध सुरू आहे. अाणखी दोन ते तीन संशयितांना अटक होणे बाकी आहे. संशयितांना अटक करण्यात कर्नाटक पोलिसांचे सहकार्य लाभले, असेही वर्मा यांनी सांगितले.
ड्रग्जबाबत काही पुरावे नाहीत
मुंगूल येथील हल्ला हा दोन टोळ्यांमधील ड्रग्जसंबंधातील वर्चस्वाच्या लढाईतून झाल्याची चर्चा आहे. याबाबत पोलीस अधीक्षक वर्मा यांनी सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात ड्रग्जसंबंधातील कोणताही पुरावा वा धागेदोरे सापडले नाहीत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. तसे काही मिळाल्यास कळवण्यात येईल, असेही वर्मा यांनी सांगितले.