कदंब महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना अर्धे तिकीट आकारण्याचा प्रस्ताव वित्त खात्याकडे पाठवला आहे. या प्रस्तावाला मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या योजनेसाठी वित्त खात्याकडे अतिरिक्त ४० कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी केली आहे, अशी माहिती कदंब परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
राज्यात खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना कदंब बसमध्ये अर्धे तिकीट आकारले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुधारित ‘माझी बस’ योजनेच्या उद्घाटन सोहळ्यात केली होती. त्याला एक महिना उलटला तरी अद्याप ती कार्यान्वित झालेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेप्रमाणे फक्त खासगी क्षेत्रात काम करणाऱ्याच नव्हे, तर अप्रेंटिसशीप करणाऱ्या, तसेच गोवा मनुष्यबळ विकास महामंडळात काम करणाऱ्या महिलांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
ही योजना केव्हा कार्यान्वित होईल, असे विचारले असता अधिकारी म्हणाले की, या योजनेसाठीचा मसुदा तयार झाला आहे. वाहतूक खात्याने तो मान्यतेसाठी वित्त खात्याकडे पाठवला आहे. या प्रस्तावाबाबत आम्ही पाठपुरावा करत आहोत. सोमवारी आम्ही पुन्हा वित्त खात्याकडे याबाबत चौकशी करणार आहोत.
योजनेसाठी अतिरिक्त ४० कोटींची मागणी
ही योजना कार्यान्वित करण्यासाठी या आर्थिक वर्षात आम्ही वित्त खात्याकडे १७० कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी केली आहे. सध्या कर्मचाऱ्यांचा पगार आणि अन्य खर्च मिळून कदंब महामंडळाला वार्षिक १३० कोटी रुपये खर्च येतो. त्यामुळे ही योजना कार्यान्वित करण्यासाठी आम्ही अतिरिक्त ४० कोटी रुपये मंजूर करण्याची मागणी केली आहे, अशी माहिती कदंबच्या अधिकाऱ्याने दिली.