पोलिसांवरचा अविश्वास का वाढतो?

तुमच्यावरच हल्ले होत असतील तर तुमच्याकडून जनतेने सुरक्षेच्या भावनेने पहावे का? पोलिसांवरचा अविश्वास का वाढतो आहे, त्याचाही शोध पोलिसांनी घ्यायला हवा. आपण जनतेच्या सुरक्षेसाठी बसलेलो आहोत की, काही विशिष्ट लोकांच्या सेवेसाठी आहोत, हे पोलिसांनी आधी ठरवावे लागेल.

Story: संपादकीय |
19th August, 11:44 pm
पोलिसांवरचा अविश्वास का वाढतो?

फातोर्ड्यात पोलिसांना वाकुल्या दाखवून सराईत गुंडांनी दुसऱ्या टोळीच्या गुंडांवर हल्ला केल्यानंतर गेल्या आठवडाभरापासून हे प्रकरण चर्चेत आहे. काहीतरी घटना घडल्यानंतरच जागे होणारे पोलीस खाते, या घटनेनंतर अतिसक्रिय झाले. एका टोळीच्या सदस्यांच्या मुसक्या आवळल्यानंतर दुसऱ्या टोळीच्या म्होरक्यालाही अटक करण्यासाठी दबाव आला. आतापर्यंत दोन्ही टोळ्यांतील सदस्यांना कुठल्या ना कुठल्या कारणावरून अटक करण्यात आली आहे. ज्या टोळीच्या गुंडांवर हल्ला झाला, त्यांना सुरुवातीला सहानुभूती मिळाली, परंतु नंतर पोलिसांनी त्या टोळीच्या सदस्यांना दुसऱ्या एका प्रकरणात पकडले. ही टोळीयुद्धाची घटना ताजी असतानाच एका बिल्डरकडून खंडणी मागितल्याच्या कारणावरून दुसऱ्या टोळीच्या गुंडांचे अटक सत्र पोलिसांनी सुरू केले. याच दरम्यान दक्षिण गोव्यातच आणखी काही घटना घडल्या, ज्यात पोलिसांवर हल्ले करण्याचे प्रकार घडले. त्यामुळे दक्षिण गोव्यातील पोलीसच सध्या चर्चेत आहेत. 

गेल्या आठवड्यात फातोर्ड्यात मडगाव-कोलवा मार्गावर दोघा तरुणांवर हल्ला झाला. त्यात गोळीबारही झाला. ही फार मोठी गंभीर घटना होती. त्या घटनेत कोयते, दंडुक्याने हल्ला आणि पिस्तुलाने गोळीबारही झाला होता. त्यामुळे त्याचे गांभीर्य आणखी वाढले होते. या गुंडांच्या टोळ्यांना त्या परिसरातील राजकीय नेत्यांचा आश्रय असतो, हे आता सासष्टीत दोन्ही टोळ्यांच्या बाबतीत बोलले जात आहे. पण अशा घटना घडल्या की राजकीय नेते हात वर करतात. जी घटना गेल्या आठवड्यात घडली होती, तो हल्ला हत्या करण्याच्या हेतूनेच झाला होता, असा संशय आहे. दुसऱ्या बाजूकडूनही तसेच प्रत्युत्तर मिळाल्यामुळे हा सगळा डाव फसला. सुरुवातीला हा हल्ल्याचा प्रकार दिसत होता, पण नंतर दोन टोळ्यांमधील हे युद्ध असल्याचे स्पष्ट झाले. 

मुख्यमंत्र्यांनी असे प्रकार गोव्यात खपवून घेतले जाणार नाहीत, असे सांगून बेकायदा सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या एजन्सी बंद करण्याचेही जाहीर केले होते. त्यानंतर पोलीस महासंचालकांनी दक्षिण गोव्याचा दौरा करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनीही गोव्यात टोळीयुद्ध किंवा पोलिसांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असे स्पष्ट केले. पण तोपर्यंत हे दोन्ही प्रकार गोव्यात घडले होते. टोळीयुद्धाची सुरुवात आणि कुंकळ्ळी पोलिसांवर काहीजणांनी हल्ला करून जबर जखमी करण्याचा प्रकार घडला होता. पोलीस महासंचालक दक्षिण गोव्याचा दौरा करून परतल्यानंतर त्यांच्या विधानाला खोडून काढणारा प्रकार वास्कोत घडला. सात जणांच्या टोळीने वास्कोत पोलिसांवर हल्ला केला. दक्षिण गोवा पोलिसांच्या मागे लागलेली साडेसाती सुटण्याचे नाव घेत नाही. मडगाव परिसरात परवा काहीजणांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही शिवीगाळ केल्यासंदर्भात गुन्हा नोंद झाला आहे. या घटना का घडत आहेत, त्याचा विचार पोलिसांना करावा लागेल. 

येणारा - जाणारा जर पोलिसांना अशा प्रकाराने हलक्यात घेऊ लागला तर काही दिवसांत पोलिसांची भीती कोणत्याच गुंड मवाल्याला राहणार नाही. ही वेळ आपल्यावर का आली आहे, त्याचा विचार गोवा पोलिसांनी करायला हवा. आपले कुठे काय चुकत आहे का, त्याचाही विचार पोलिसांनी करण्याची गरज आहे. जनता तुमचा सन्मान करते, पण गुन्हेगार तुम्हाला का जुमानत नाहीत, हे कोडे पोलिसांनी सोडवण्याचा प्रयत्न करायला हवा. तुमच्यावरच हल्ले होत असतील तर तुमच्याकडून जनतेने सुरक्षेच्या भावनेने पहावे का? पोलिसांवरचा अविश्वास का वाढतो आहे, त्याचाही शोध पोलिसांनी घ्यायला हवा. आपण जनतेच्या सुरक्षेसाठी बसलेलो आहोत की, काही विशिष्ट लोकांच्या सेवेसाठी आहोत, हे पोलिसांनी आधी ठरवावे लागेल. दक्षिण गोव्यात सध्या होत असलेले गुन्हे पाहता ज्यात, दागिने विक्रेत्यावरील हल्ल्यापासून, घरफोड्या, पोलिसांवरील हल्ले, गुंडांचे टोळीयुद्ध हे सारेच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करणारे आहे. पोलीस महासंचालकांनी पोलिसांची कार्यपद्धत बदलण्याची गरज आहे. फक्त गुंडगिरीच नव्हे तर उठसूठ पोलिसांच्या अंगावर धावून येणाऱ्यांनाही धडा शिकवावा लागेल. जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस आहेत आणि जनतेने विश्वासाने आपल्या समस्या घेऊन पोलिसांकडे यावे, अशी विश्वासार्हता पोलिसांनी निर्माण करावी यासाठी प्रयत्न करावेत. आपल्या खासगी कामा, धंद्यांना प्राधान्य देणाऱ्यांना पोलीस खात्याचे काम हे आपले प्रथम कर्तव्य आहे, याची जाणीव करून द्यावी. पोलीस - गुन्हेगार सिंडिकेटच होणार नाही यासाठी काय करता येईल? पोलीस दलातील काही घरभेद्यांना शोधून प्रसंगी त्यांचा बंदोबस्तही करावा लागेल.