पुण्यात चोरी करून गोव्यात आलेल्या चोराला म्हापसा पोलिसांनी शिताफीने ठोकल्या बेड्या!

पुणे पोलिसांकडून म्हापसा पोलिसांचे कौतुक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
13th August, 04:50 pm
पुण्यात चोरी करून गोव्यात आलेल्या चोराला म्हापसा पोलिसांनी शिताफीने ठोकल्या बेड्या!

म्हापसा: पुण्यातील कोथरूड येथे रंगकाम करताना घरातील ४ लाख रुपये किंमतीचे  दोन सोन्याचे चोरून गोव्यात पलायन केलेल्या संशयिताला म्हापसा पोलिसांनी शिताफीने पकडले. या कामगिरीबद्दल पुणे पोलिसांनी गोवा पोलिसांचे कौतुक केले आहे.

ही चोरी २८ जुलै रोजी घडली. फिर्यादी कुटुंबाने घराच्या रंगकामाची जबाबदारी पेंटर प्रमोद शिंदे (रा. कोथरूड, पुणे) याच्यावर सोपवली होती. मात्र, संधी साधून त्याने बेडरूममधील कपाटातून २ सुवर्ण कड्या चोरल्या. चोरीनंतर तो अर्धवट रंगकाम सोडून गोव्याकडे रवाना झाला. तक्रार नोंद झाल्यानंतर चौकशीत तो पुणे-गोवा बसने गोव्याला पळाल्याचे स्पष्ट झाले. पुणे पोलिसांनी तत्काळ गोवा पोलिसांशी संपर्क साधला. म्हापसा पोलिसांनी बस स्थानकावर सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चोरीतील एक कडे (किंमत २ लाख रुपये) सापडले.

त्यानंतर पुणे पोलीस म्हापसा पोलीस स्थानकातून आरोपीला ट्रान्झिट रिमांडवर घेत पुण्याकडे रवाना झाले. या तत्पर व समन्वयपूर्ण कामगिरीसाठी पुणे पोलिसांनी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता, म्हापसा पोलीस निरीक्षक निखील पालेकर, उपनिरीक्षक विशाल मांद्रेकर, कॉन्स्टेबल राजेश कांदोळकर व महेंद्र मांद्रेकर यांचे कौतुक केले आहे. 



हेही वाचा