पर्वरी स्केचर्स शोरुममध्ये ७३ हजारांचा गैरव्यवहार

स्टोअर मॅनेजरवर अफरातफरीचा गुन्हा दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th August, 11:16 pm
पर्वरी स्केचर्स शोरुममध्ये ७३ हजारांचा गैरव्यवहार

म्हापसा : पर्वरीतील चोगम रोडवरील स्केचर्स शोरुममध्ये ७३ हजारांचे कपडे आणि पादत्राणे या वस्तूंचा गैरव्यवहार करण्यात आला. याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी दुकानाचे स्टोअर व्यवस्थापक संशयित प्रेम सुनील वर्मा (रा, आराडी कांदोळी) यांच्याविरुद्ध अफरातफरीचा गुन्हा नोंद केला आहे.

स्केचर्स दुकानाच्या यूके मल्टीकॉर्पोरेशन या कंपनीचे व्यवस्थापक दिनेश पटेल यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. हा गैरव्यवहाराचा प्रकार दि. २४ जुलै २०२४ ते दि. ११ मार्च २०२५ या कालावधीत घडला आहे.

संशयित आरोपी हा शोरुममध्ये स्टोअर व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर शोरुमचे अकाऊंट, स्वरुप आणि विक्री व मालाची ने- आण अशा बाबींच्या जबाबदारीचे काम सोपवण्यात आले होते. मात्र, संशयिताने कंपनीच्या स्टॉकमधील एकूण २५ युनिट्स वस्तू म्हणजेच ७३ हजार ४७५ रूपये किमतीच्या अॅसेसरीज, कपडे आणि पादत्राणे या वस्तूंचा गैरव्यवहार करुन कंपनीचा विश्वासघात केला.

पोलिसांनी फिर्यादींच्या तक्रारीच्या आधारे संशयित आरोपीविरुद्ध भा.न्या.सं.च्या ३१६(४) कलमान्वये अफरातफरीचा गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रतिक तुळसकर हे पुढील तपास करीत आहेत. 

हेही वाचा